निवडणूक खर्चावर निरीक्षकांसह प्रशासनाचे विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:21 AM2019-04-14T00:21:25+5:302019-04-14T00:23:49+5:30
१७ व्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून, प्रत्येक वेळी शासकीय नोंदवहितील खर्च व उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा ताळेबंद केला जात आहे. यामध्ये ९ एप्रिलपर्यंत भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांचा खर्च १४ लाख ४० हजार तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा खर्च १० लाख ४१ हजार इतका झाल्याचे नोंदवहीत दाखवण्यात आला आहे.
प्रभात बुडूख।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : १७ व्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून, प्रत्येक वेळी शासकीय नोंदवहितील खर्च व उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा ताळेबंद केला जात आहे. यामध्ये ९ एप्रिलपर्यंत भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांचा खर्च १४ लाख ४० हजार तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा खर्च १० लाख ४१ हजार इतका झाल्याचे नोंदवहीत दाखवण्यात आला आहे.
अनेक वेळा उमेदवारांनी सादर केलेला खर्च व प्रशासनाच्या नोंदवहीतील खर्च याची आकडेवारी जुळत नाही, त्यामुळे याची माहिती देऊन त्या राजकीय पक्षाकडून खर्चाच्या संदर्भात माहिती मागवली जात आहे. त्यामुळे ताळेबंद जुळवण्यात निवडणूक विभागाला यश आल्याचे दिसून येत आहे. निवडणुका ४ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी दोन दिवस प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे १० तारखेपासून पुढे प्रचाराच्या शेवटच्या तारखेपर्यंत होणार खर्च हा वाढणार असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच अंतिम खर्च सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबत सूक्ष्म खर्चावर देखील लक्ष असणार आहे. या सर्व खर्चाची नोंद अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे.
२०१४ प्रमाणेच यंदा देखील ७० लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बीड मधील सर्व उमेदवारांकडून आतापर्यंत झालेला सर्व खर्च हा धनादेशाद्वारे झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत निवडणूक विभागाकडे खर्च सादर न केलेल्या ३६ पैकी १० उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
सर्व खर्च सोमवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर निर्धारीत कालमर्यादेत निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचे तपशील शपथपत्रावर खर्च निरीक्षकांपुढे सादर करावे लागणार आहेत. दिलेल्या वेळेच्या आत निवडणूक लढवित असलेल्या उमेदवाराने खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
१० अपक्षांना नोटीस
निवडणूक प्रचार यंत्रणेसाठी खर्च केलेल्या रक्कमेचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. मात्र १० अपक्ष उमेदवारांनी याची दखल न घेतल्यामुळे त्यांना निवडणूक विभागाकडून नोटीस पाठवली आहे. खर्चाचे सादरीकरण केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत.
इतर ३४ उमेदवारांचा मिळून खर्च
१५ लाखांच्या घरात
लोकसभा निवडणुकीसाठी ३६ उमेदवार रिंगणात उतलेले आहेत. त्यापैकी भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे या मुख्य उमेदवारांचा खर्च सोडून इतर ३६ उमेदवारांचा खर्च आतापर्यंत १५ लाखांच्या घरात गेला आहे.