बीडमधील मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत ‘जिल्हा विशेष शाखा’ अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 07:22 PM2019-02-05T19:22:52+5:302019-02-05T19:23:18+5:30
मुख्यमंत्री आज बीडमध्ये आहेत. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त असतो. मात्र जिल्हा विशेष शाखा याबाबत अनभिज्ञ आहे.
बीड : मुख्यमंत्री आज बीडमध्ये आहेत. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त असतो. मात्र जिल्हा विशेष शाखा याबाबत अनभिज्ञ आहे. त्यांना या बंदोबस्ताची रात्री सात वाजेपर्यंत कसलीच माहिती नव्हती. यावरून डीएसबीचा गाफिलपणा चव्हाट्यावर येतो. केवळ कागदी घोडे नाचविण्यात येथील अधिकारी, कर्मचारी अग्रेसर असल्याचे वारंवारच्या प्रकारावरून समोर येत आहे.
जिल्हा विशेष शाखेकडे गोपनिय विभाग म्हणून पाहिले जाते. येथे सर्व माहिती उपलब्ध करून संबंधित पोलीस ठाण्यांना दिली जाते. तसेच व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व इतर प्रतिष्ठीत लोकांचा दौरा, सण, उत्सवाच्या बंदोबस्ताचे नियोजन केले जाते. मात्र बीडची शाखा केवळ नामधारी असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये असतानाही त्यांच्याकडे बंदोबस्ताचे कसलेच नियोजन नव्हते.
येथील महिला कर्मचारी चौरे यांनी बंदोबस्त तयार नसल्याचे सांगितले तर सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात बंदोबस्ताची माहिती असल्याचे सांगितले आणि पोलीस निरीक्षक मानकर यांनी उपअधीक्षक कार्यालयातून बंदोबस्ताची माहिती घेण्याचा सल्ला दिला. यावरून याच शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नेमका बंदोबस्ताची माहिती कोणाकडे आहे, याचीच त्यांना माहिती नव्हती. या सर्व परिस्थितीवरून बीडच्या जिल्हा विशेष शाखेचा गलथान कारभार चव्हाट्यावर येतो.
केवळ कागदी घोडे नाचवून वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न येथील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. येथील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावण्याचे वेध लागले आहे. जे कर्मचारी डीएसबी मध्ये योग्य काम करू शकत नाहीत, ते पोलीस ठाण्यात जावून सर्वसामान्यांची काय कामे कारणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याशी संपर्क झाला नाही. तर उपअधीक्षक सुधीर खिरडकर हे मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची पाहणी करीत असल्याने त्यांनी फोन घेतला नाही. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी आपण बंदोबस्तात असून नंतर बोलतो असे सांगितले. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.