मंदिरे खुली करून पुजाऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:02+5:302021-07-20T04:23:02+5:30
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, राज्य शासनाने सर्व गोष्टींवरील निर्बंध हटवलेले आहेत. हॉटेल, मॉल, गार्डन, विवाहस्थळे, ...
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, राज्य शासनाने सर्व गोष्टींवरील निर्बंध हटवलेले आहेत. हॉटेल, मॉल, गार्डन, विवाहस्थळे, दुकाने सुरू केलेली आहेत. काही ठिकाणी बाजारदेखील सुरू केलेले आहेत. मात्र धार्मिक स्थळे, मंदिरे बंद करून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित करून मंदिर बंद वरील निर्बंध तात्काळ हटवून दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात यावी. तसेच मंदिराची सेवा करून उपजीविका भागवणाऱ्या पुजारी, गुरव यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. शासनाने या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना सुरू केलेल्या आहेत. तसेच विवाहस्थळे, गार्डन, मॉल, हॉटेल आदींना आपापले व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. केवळ मंदिरे बंद करून शासन काय साध्य करणार आहे. मंदिरांना उघडण्याची परवानगी दिली, तर तेथूनच कोरोना पसरू शकतो काय? इतर ठिकाणांवरून कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही काय? असा सवालही निवेदनाद्वारे संजय गुरव यांनी विचारला आहे. मंदिरातील पुजारी व त्यांचे कुटुंबीय उपजीविका कशीबशी भागवत आहेत. त्यांची उपजीविका केवळ मंदिरातील पूजा-अर्चा करण्यावर अवलंबून असून, त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने मंदिराची सेवा करणाऱ्या पुजाऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना उपजीविका भागविण्यासाठी सहाय्य करावे, मंदिरांची दारे उघडी केली, तर त्या-त्या मंदिर ठिकाणी शासनाच्या कोरोना नियमांचे पालन केले जाईल. त्यामुळे शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संतोष शिंदे, अजय पुजारी, संतोष पुजारी, भीमराव गुरव, राम शेळके, महेश वाघमारे, रामदास काळे, कैलास पुजारी, बाळासाहेब शिवणीकर, राजू गवळी, उत्तरेश्वर मोकाशे, सुरेश पुजारी, दत्तात्रय आंबेकर, अजय गुरव, विजय गुरव, चंद्रकांत गुरव, रमेश गुरव, सूरज क्षीरसागर, विशाल धायतोंडे, शुभम धायतोंडे, प्रसाद गुरव, गणेश गुरव, अमर गुरव, उत्तम गुरव, मनोहर काळे आदींची उपस्थिती होती.