कारवाई करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:57+5:302021-07-10T04:23:57+5:30
अंबाजोगाई : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आले होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. ...
अंबाजोगाई : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आले होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. मात्र आंदोलक अजूनही पोलीस उपअधीक्षक जायभाये यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत निलंबन होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. माधव जाधव यांनी जाहीर केली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा शुक्रवारी सायंकाळी अंबाजोगाईत आले होते. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन पुढेही सुरूच राहणार आहे.
काय आहे प्रकरण
अंबाजोगाई शहरातील प्रतिष्ठित नागरिकाला चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण करून जातिवाचक अर्वाच्च शिवीगाळ करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आजूबाजूच्या गावांतून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला; तर, अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील डॉ. सुहास यादव यांच्यावर विनयभंग आणि ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या गुन्ह्यात डॉ. यादव यांना जाणीवपूर्वक गुंतविण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा दावा आहे. सध्या डॉ. यादव फरार असल्याने पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. या दरम्यान डॉ. यादव आणि त्यांचे चुलतभाऊ विलास यादव यांच्यात काही फोन कॉल झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे चौकशी करण्यासाठी म्हणून स्वतः डीवायएसपी सुनील जायभाये यांनी मंगळवारी (६ जुलै) रात्री विलास यादव यांना प्रशांतनगर भागात गाठले. तिथे जायभाये यांनी विलास यादव यांना अर्वाच्च भाषेत जातीवरून शिवीगाळ करीत मारहाण केली. कुटुंबाबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली, असे क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील वायरल झाले आहे. त्यानंतर यादव यांना पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. शुक्रवारी या आंदोलनात अंबाजोगाई करांसह तालुक्यातील येथील ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. आंदोलनस्थळी दिवसभर मोठी गर्दी दिसून आली.
यांनी दिला आंदोलनात पाठिंबा
शुक्रवारी सुरू असलेल्या या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबाजोगाई साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, केज येथील व्यापारी महासंघाचे महादेव सूर्यवंशी, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, सूरज पटाईत, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, पं. उद्धवराव आपेगवकर, अशोकराव देशमुख, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शिवसेनेचे गजानन मुडेगावकर यांच्यासह विविध पक्ष व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.