बीड पोलिसांची विशेष मोहीम; सात वाँटेड जेरबंद, अवैध दारू विक्रेते, मटकाबहाद्दरांची धरपकड
By संजय तिपाले | Published: August 26, 2022 12:47 PM2022-08-26T12:47:45+5:302022-08-26T12:48:44+5:30
गुन्हे शाखेची दोन दिवस मोहीम, १३ ठिकाणी टाकले छापे
बीड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने २४ व २५ ऑगस्टला विशेष मोहीम राबविली. त्यात सात वाँटेड आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर अवैध दारूविक्रेते, मटका बहाद्दरांवर १३ ठिकाणी छापे टाकून धरपकड केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले.
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत व संजय तुपे यांच्या नेतृत्वाखाली पथके स्थापन केली. २४ व २५ ऑगस्टला अवैध दारूविराेधात आठ, ऑनलाइन चक्री जुगार, सोरट जुगारावर प्रत्येकी एक व कल्याण मटका जुगारावर तीन अशा एकूण १३ कारवाया केल्या. यात लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून २० जणांना पकडले. चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पेठ बीड हद्दीतील सहा व शिरुर ठाणे हद्दीतील एक अशा सात वाँटेड आरोपींना अटक केली. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन केले.