मराठीच्या पेपरला अंबाजोगाईत फुटले पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:04 AM2019-03-02T00:04:28+5:302019-03-02T00:05:13+5:30
दहावी बोर्डाच्या शुक्रवारी असलेल्या मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होताच तब्बल सव्वा तासात शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पडली. ही प्रश्नपत्रिका अनेकांनी एकमेकांना पाठविली. परिणामी, अनेकांच्या पाल्यांना प्रश्नपत्रिकाच हाती लागल्याचा आनंद मावेना.
अंबाजोगाई : दहावी बोर्डाच्या शुक्रवारी असलेल्या मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होताच तब्बल सव्वा तासात शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पडली. ही प्रश्नपत्रिका अनेकांनी एकमेकांना पाठविली. परिणामी, अनेकांच्या पाल्यांना प्रश्नपत्रिकाच हाती लागल्याचा आनंद मावेना. रात्री ही चर्चा संपूर्ण अंबाजोगाई शहरात सुरु झाल्याने दहावीच्या मराठी प्रश्नपत्रिकेला पाय फुटल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे.
दहावी बोडार्ची परीक्षा शुक्रवार पासून सुरु झाली. यावर्षी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने नवीन अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. आज पहिल्याच दिवशी मराठी या विषयाचा पेपर होता. परीक्षेचा कालवधी सकाळी ११ ते २ असा होता. अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकांचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप आहे. या ग्रुपवर एका शिक्षकाने दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षण करताना मराठीच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. हे फोटो त्यांनी परीक्षा ११ वाजता सुरु झाल्यानंतर सव्वा तासाने ग्रुपवर टाकले. हे फोटो ग्रुपवर पडताच ग्रुपमधील अनेक शिक्षकांच्या नजरेस ही प्रश्नपत्रिका पडली. कोणी माहितीपोटी तर कोणी याचा फायदा इतरांना व्हावा या उद्देशाने भराभर पोस्ट इतरत्र पाठविण्याचा सपाटा लावला. तर, अनेक शिक्षकांनी पोस्टकर्त्या शिक्षकाला खडसावले. शिक्षकांच्या ग्रुपवर मराठीची प्रश्नपत्रिका आहे याची माहिती दुपारनंतर शहरात पसरली. अनेकांनी तर या ग्रुपचा दाखला देत प्रश्न पत्रिकाही दाखविल्या. एकंदरीत, हा प्रकार खळबळजनक ठरला. याप्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आल्याने संबंधितांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते.
गटशिक्षणाधिकारी देखील ग्रुपमध्ये
प्रश्नपत्रिका फुटलेल्या शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे हे देखील आहेत. त्या शिक्षकाने ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिका टाकल्यानंतर शिंदे यांनी ग्रुपमध्ये त्यावर कसलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. परंतु, शिंदे यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे शिंदे यांनी ही पोस्ट पाहिली अथवा नाही, किंवा पाहूनही दुर्लक्ष केले हे अद्याप स्पष्ट नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग मेंगुडे नामक शिक्षक हा भावठाणा येथील साने गुरुजी विद्यालयात कार्यरत आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर १२.३० च्या सुमारास प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यासंदर्भात गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी (मा.) यांना कळविले. त्याचवेळी याप्रकरणी तात्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शिक्षण विभागाने ही बाब परीक्षा मंडळास कळविली आहे.
या प्रकरणाची तक्रार मला प्राप्त झाली आहे. त्याबाबत सखोल चौकशी करून शनिवार सायंकाळ पर्यंत यासंदर्भात ठोस करण्यात येणार असल्याचे सांगून नेमका हा प्रकार कसा घडला या बाबतही सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे.
- अमोल येडगे,
मुख्य कार्यकारी अधिकारी