रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:05+5:302021-04-16T04:34:05+5:30
बीड : जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात ...
बीड : जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास बीड जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्ष संघटनांतील कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे गुरुवारी तब्बल १५१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा या रक्तदान अभियानातील सहभाग लक्षणीय होता.
बीड जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राप्त परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उपचार केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भासत आहे. याचाच विचार करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा लेखाधिकारी शिवप्रसाद जटाळे, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष साळवे, जिल्हा शिक्षणाधिकारी (मा. ) विक्रम सारूक, रूपाली मस्के, कविता गित्ते, सावित्री जाधव, लता काळे, सोनाली तांदळे, प्रतिभा खाडे, सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे, सचिन जाधव यांच्यासह सामाजिक क्षेत्र व विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
पालकमंत्र्यांनी केले कौतुक
जिल्हा समाजकल्याण विभागाने माझ्या आवाहनास प्रतिसाद देत उत्कृष्ट नियोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदानाचा आगळावेगळा व दिशादर्शक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान केलेल्या सर्वांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
इतर ठिकाणी झाले रक्तदान
बीडसह परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, माजलगाव या ठिकाणांहून समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळा, दिव्यांग शाळा आदींच्या कर्मचाऱ्यांनीदेखील या महारक्तदान शिबिरात हजेरी लावून एकूण १५१ जणांनी रक्तदान केले. लसीकरण केल्यानंतर जवळपास २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही, या नियमामुळे जिल्ह्यातून रक्तदान करण्यासाठी आलेल्या अनेक जणांना परत जावे लागले; अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली.
===Photopath===
150421\15_2_bed_15_15042021_14.jpg
===Caption===
महारक्तदान शिबीरात रक्तदान करताना समाजकल्याण आयुक्त डॉ.सचिन मडावी, उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील व इतर