ग्रंथ, छायाचित्र प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:49 AM2018-11-28T00:49:02+5:302018-11-28T00:49:13+5:30
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात ग्रंथ आणि छायाचित्रे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथे सुरु असलेल्या ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात यावर्षीही सांस्कृतिक, प्रबोधनपर आणि साहित्यिक उपक्रमांची रेलचेल दिसून आली. समारोहातील ग्रंथ आणि छायाचित्रे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
कै.यशवंतराव चव्हाण यांचा व्यासंग, विचारांचा व त्यांना अभिप्रेत असणाऱ्या सर्व उपक्रमांचा उहापोह यावर्षीही पहावयास मिळाला. या समारोहात शहर व परिसरातील नागरिक, रसिक हे मोठ्या प्रमाणावर ग्रंथ खरेदी करतात.विशेष करून समारोहाचे उद्घाटक समीक्षक डॉ.किशोर सानप यांनी लिहिलेल्या पुस्तकांना वाचकांची चांगली मागणी दिसून आली. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन चरित्राचा परिचय करून देणाºया ग्रंथ खरेदीकडे रसिकांचा कल होता. भारताचे संविधान, कथा, कविता, प्रवासवर्णन, माहितीप्रधान, ललीत, स्पर्धा परीक्षा, चरित्र ग्रंथ, ऐतिहासिक, कायदे विषयक, पाकशास्त्र, धार्मिक, लहान मुलांसाठीचे पुस्तके, बडबड गीते, संस्कार ग्रंथ, समीक्षणात्मक ग्रंथांना मागणी होती. बालसाहित्य, इसापनीती, चुटकुले, म्हणी, वाक्यप्रचाराची पुस्तके, महापुरूषांची आत्मचरित्रे, चरित्रात्मक पुस्तके खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता. या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद लातूर, नांदेड आणि नागपूर येथील प्रकाशन संस्थांची पुस्तके येथे उपलब्ध होती.
या ठिकाणी छायाचित्रकार प्रा.अभिजीत लोहिया, डॉ.शुभदा लोहिया, मुन्ना सोमाणी, विजय लोखंडे, शंतनू सोमवंशी, डॉ.अविनाश मुंडे, सुशांत सोमवंशी, नीरज गौड, राजवीर मेहता व डॉ.उदय जोशी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, या प्रदर्शनाला ‘‘भोवताल- २०१८’ हे नाव देण्यात आले आहे. या प्रदर्शनात अंबाजोगाई परिसरातील विविध पक्षी,नागमोडी नदी पात्र, डोंगर, वाहते पाण्याचा प्रवाह तसेच दुर्मिळ वन्यजीव साप, अजगर, मुंगूस, काळवीट,कोल्हा, हरीण,सरडा व नानाविध फुलांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन वाईल्ड लाईफ (वन्य जीव), मायक्र ो (सूक्ष्मजीव) आणि लॅन्डस्केप (निसर्गचित्र) इ. चित्रे प्रदर्शनात मांडली होती. प्रदर्शन प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य होते.
रानडे यांच्या गझल गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात गायक दत्तप्रसाद रानडे, अंजली मराठे यांच्या ‘रुह’ पुणे प्रस्तुत हिंदी, ऊर्दू व मराठीच्या बहारदार गझल मैफिलीस रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मराठी व हिंदी चित्रपटातील गझल, मैफलीतील गझल आदी श्रवणीय रचनांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. या मैफिलीत प्रत्येक गझल रचनेला रसिकांंनी दाद दिली. गुलाबी थंडीत उत्तररात्रीपर्यंत चाललेल्या ‘सबरंग’ या गझल मैफिलीने अंबाजोगाईकर लयबध्द शब्द आणि सुरेल संगीतात न्हाऊन निघाले.
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसºया दिवशी सोमवारी रोजी रात्री साडेआठ वाजता येथील वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दत्तप्रसाद रानडे व अंजली मराठे यांच्या ‘सबरंग’ या गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या मैफिलीत वादक निनाद सोलापूरकर (सिंथेसायझर), अमोद कुलकर्णी (तबला), स्वानंद जावडेकर (तंत्र निदेशक) यांनी साथसंगत केली. तर यावेळी दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या निवेदनाने मैफिलीत बहार आणली. सतीश लोमटे यांनी सर्व सहकाºयांचे स्वागत केले. सूत्रसंचालन देविदास पवार यांनी करून आभार मानले. मैफलीच्या यशस्वीतेसाठी समारोह समितीने परिश्रम घेतले.