‘ऑन दी स्पॉट’ कोरोना टेस्टची धास्ती; माजलगावात रहदारी मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:34+5:302021-04-19T04:30:34+5:30
माजलगाव : जमावबंदी व संचारबंदी असूनही नागरिकांकडून रहदारी बाबतीत कुठलाच नियम पाळण्यात येत नसल्याने तालुका प्रशासनाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांविरूद्ध ...
माजलगाव :
जमावबंदी व संचारबंदी असूनही नागरिकांकडून रहदारी बाबतीत कुठलाच नियम पाळण्यात येत नसल्याने तालुका प्रशासनाने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांविरूद्ध जागेवर अँटिजेन चाचणीची मोहीम उघडली. परिणामी रविवारी टेस्टच्या भीतीने शहरात रहदारी मंदावल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, १३५ नागरिकांना पकडून त्यांची चाचणी केल्यानंतर ५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. या मोहिमेमुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली.
राज्यात लॉकडाऊन जाहीर होताच विनाकारण गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस, तहसील, नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत होते. परंतु जनतेकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने शनिवारी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी संयुक्तिक आदेश काढला. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन दी स्पॉट’ अँटिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरला दाखल करण्यात येईल असे हे आदेश होते. याचा परिणाम रविवारी शहरातील रहदारीवर दिसून आला. इतर वेळी दिसणारी शहरातील गर्दी, कोपऱ्या-कोपऱ्यावर जमा होणाऱ्या चौकड्या, मजेने फिरायला आलेले बेजबाबदार चेहरे दुपारपर्यंत गायब झालेले दिसून आले. तर रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांची परभणी टी पॉईंट, संभाजी चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, शहर पोलीस ठाण्यासमोर अँटिजेन टेस्ट प्रशासनाने करून घेतली. यावेळी झालेल्या तपासणीत पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांना तत्काळ कोविड सेंटरला हलविण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने चांगली शक्कल लढवून काढलेल्या आदेशाचा रहदारीवर तत्काळ परिणाम झाल्याने नागरिकांकडून तालुका प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
===Photopath===
180421\img_20210418_112058_14.jpg~180421\img_20210418_111915_14.jpg