उद्ध्वस्त रानातली पिके पाहिली पथकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:27 AM2019-11-24T00:27:39+5:302019-11-24T00:28:18+5:30
केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
बीड : केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पीक हातचे गेले. त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करु न केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी हे पथक आले होते. उद्ध्वस्त रान, नुकसान झालेल्या बाजरी, सोयाबीनचे ढिगारे, अजूनही शेतात साचलेले पाणी आणि उजाड फळबागा या पथकाने प्रातिनिधीक स्वरुपात पाहिल्या. इतर शेतकºयांचेही असेच नुकसान झाल्याचे संवाद करताना शेतकरी सांगत होते.
आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव व्ही. थिरुप्पूगाझ व सदस्य डॉ. के. मनोहरन् यांच्या पथकासमवेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, विभागीय सहसंचालक (कृषी) एस के दिवेकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, आ. लक्ष्मण पवार आदि उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे केंद्रीय पथकाने विलास कोटांबे यांच्या बाजरी पिकाची पाहणी करुन संवाद साधला. रांजणी येथे कुंडलिक जाधव यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. याच तालुक्यातील जळगाव मांजरा येथे दामोदर इजगे यांच्या शेतात कापूस पिकांची तसेच वाहेगाव आमला येथे अरु णा चव्हाण यांच्या शेतात पाहणी केली.
यानंतर पथकाने माजलगाव येथे शिवाजीराव रांजवण यांच्या डाळिंब फळबागाची, तर प्रणिता रेवणवार यांच्या सोयाबीनची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार प्रतिभा गोरे आदी उपस्थित होत्या. लहामेवाडी येथे अल्लाउद्दीन खाजामिया यांच्या शेतात पाहणी करुन धारुर तालुक्यातील तेलगाव येथे उत्तमलाल कासलीवाल यांच्या शेतात सोयाबीन पीक पाहणी व संवाद केला. यावेळी तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर उपस्थित होते. त्यानंतर पथकाने वडवणी तालुक्यातील पुसरा येथे सोनाबाई वाव्हळ यांच्या बाजरी पिकांची तसेच मोरवड येथे माऊली शेळके यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी उपस्थित होत्या. तसेच बीड तालुक्यातील घाटसावळी येथे महादेव लांडे यांच्या बाजरी पिकाची तर जरुड येथे बाबासाहेब कोरडे यांच्या शेतातील कपाशी पिकांची पाहणी केली.