दुकानांसमोरील अंतराचे चौकोन पुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:19+5:302021-01-18T04:30:19+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर कमी राखले जावे. यासाठी दुकानांसमोर ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर कमी राखले जावे. यासाठी दुकानांसमोर डिस्टन्स ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी चौकोन आखले होते. सामाजिक अंतर ठेवून ग्राहक या चौकाेनात उभे राहत होते. यामुळे गर्दी कमी होत होती व सामाजिक अंतराची अंमलबजावणी होत होती. मात्र, आता दुकानांसमोरील अंतराचे चौकोन पुसले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा दुकानांसमोर गर्दी वाढू लागली आहे.
पिकांवर आले रोगराईचे संकट
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून दररोज ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारावी लागतात. या औषधांचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना होतो.
ग्रामीण भागात पथदिव्यांचा अभाव
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेड्यांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. यामुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागात यापूर्वीही अंधाराचा फायदा घेऊन अनेक चोरींच्या घटना घडलेल्या आहेत. पथदिवे व वीजपुरवठा सुरू करून ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.
सुविधा अभावी खवा उद्योग अडचणीत
अंबाजोगाई : खवा व्यावसायिकांना शासनाकडून सोयीसुविधा तसेच सवलती शासनाकडून मिळतात. मात्र, तालुकास्तरावर खवा व्यावसायिक या संदर्भात कारवाई करण्यासाठी गेल्यास त्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जातात. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भट्ट्यांऐवजी मशीनद्वारे खव्याची निर्मिती होती. मात्र, ही मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी जुन्याच भट्ट्यांवर खवा उद्योग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो. अन्यथा ते मास्क चढ्या भावाने विक्री केले जातात. तसेच दोन पदरी आणि तीन पदरी मास्कच्या किमतीही दुप्पटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे.