SSC Exam: सोशल मीडियावरचा टाइमटेबल पाहिला, हिंदीचा पेपर बुडाला; अनेकांचे वर्ष वाया
By अनिल भंडारी | Published: March 8, 2023 07:02 PM2023-03-08T19:02:16+5:302023-03-08T19:02:45+5:30
निष्काळजीपणामुळे अनेक मुलांचे एक वर्ष जाणार वाया
बीड : सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने बुधवारी अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. तर घाईघाईने उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा नियमांमुळे केंद्रात प्रवेश मिळू शकला नाही.
सोशल मीडियावर एक वेळापत्रक परीक्षेच्या आधीपासून फिरत आहे. या वेळापत्रकात प्रथम सत्रात इयत्ता दहावीच्या द्वितीय भाषेचा पेपर गुरुवार, दि. ९ मार्च २०२३ रोजी दाखविण्यात आला आहे. या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला गेले नाहीत. विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीचा हिंदी (द्वितीय भाषा) विषयाचा पेपर बुधवार, ८ मार्च रोजी होता. त्यामुळे ही बाब लक्षात आल्याने काही शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना फोनद्वारे संपर्क करून दहावीच्या हिंदीचा पेपर ८ मार्च रोजी असल्याचे व परीक्षार्थी परीक्षेला गेला का? याची खात्री केली. जे गेले नाही, त्यांना परीक्षेसाठी ताबडतोब वेळेवर पोहोचण्याचे कळविले. हिंदीचा पेपर ९ मार्च रोजी नसून तो ८ मार्च रोजीच असल्याचे समजल्यानंतर विद्यार्थी व पालकांची धावपळ झाली. शहरातील एका केंद्रावर एक विद्यार्थी परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचल्याने त्याला बोर्डाच्या नियमानुसार प्रवेश मिळू शकला नसल्याने रडू कोसळले. केवळ सोशल मीडियावरील वेळापत्रक आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र हिंदीचा पेपर बुडाला.
अधिकृत वेळापत्रक इथे असते की
विभागीय शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. परीक्षेसाठीच्या हाॅल तिकिटावर मागील बाजूस छापील वेळापत्रक असते. तसेच बोर्डाच्या संकेतस्थळावरही अधिकृत वेळापत्रक असते. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या दर्शनी भागातही वेळापत्रक डिस्पले केलेला असतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी काळजी घेतली पाहिजे.
पालकांनीदेखील खात्री करायला हवी
परीक्षेपूर्वी देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना शिक्षण मंडळामार्फत केल्या जातात. अधिकृत वेळापत्रकांनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला जावे. पालकांनीदेखील वेळोवेळी खात्री करावी. सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे शिक्षणप्रेमींनी सांगितले.
दहावीचे ९४३ गैरहजर बारावीचे ४१६
इयत्ता दहावीच्या द्वितीय भाषा हिंदीच्या परीक्षेला ३५८९० पैकी ३४९४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ९४३ विद्यार्थी गैरहजर होते. इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेला २२५१० पैकी २२१०० विद्यार्थी हजर होते. ४१६ विद्यार्थी गैरहजर होते.