दहावीची परीक्षा ११ व्या प्रयत्नांत उत्तीर्ण; कणखर वडिल अन् जिद्दी कृष्णाची अनोखी कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:55 PM2024-05-28T16:55:10+5:302024-05-28T17:03:54+5:30
SSC Result 2024: वडिलांच्या प्रोत्साहनांमुळे कृष्णा देत राहिला परीक्षा, यंदा पास होताच ग्रामस्थांनी काढली मिरवणूक
परळी (बीड) : सहा वर्षाच्या काळात दहा वेळा दहावीची परीक्षा दिली पण यश काही प्राप्त होत नव्हते. यंदा अकराव्या प्रयत्नात गणित विषयात ३५ मार्क घेत कृष्णा अखेर दहावी उत्तीर्ण झाला. कायम प्रोत्साहन देणाऱ्या वडिलांची इच्छा जिद्दीने मुलाने पूर्ण केल्याने ग्रामस्थांनी त्याची गावातून मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला. ही अनोखी कहाणी आहे परळी तालुक्यातील डाबी गावातील कृष्णा मुंडे याची.
परळी तालुक्यातील डाबी गावातील येथील कृष्णा नामदेव मुंडे याने पहिल्यांदा २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली. यावेळी एकाच विषयात तो उत्तीर्ण झाला. मंजूर असलेले वडील नामदेव मुंडे यांनी कृष्णाला प्रोत्साहन देत पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले. वडिलांच्या आग्रहावरून कृष्णाने दहावीची परीक्षा अकरा वेळेस दिली. पहिल्या दहा प्रयत्नांत एक एक करून विषय निघाले. पण गणित विषय अवघड वाटत असल्याने यंदा कृष्णाने तयारी करत ११ व्या वेळेस दहावीच्या परीक्षेला सामोरे गेला.
वडिलांच्या प्रोत्साहनांमुळे तब्बल ११ व्या प्रयत्नांत कृष्णा मुंडे दहावीची परीक्षा उत्तीर्ण, पास होताच ग्रामस्थांनी काढली मिरवणूक#SSCResult2024#beednewspic.twitter.com/wS55hT31Lr
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 28, 2024
मजूर नामदेव मुंडे हे डाबी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील आहे. आपला मुलगा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे ही त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा. कृष्णा मुंडे याने २०१८ मध्ये पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली परंतु या परीक्षेत त्याला काही यश प्राप्त झाले नाही. त्यानंतरच्या दहा परीक्षेतही एखादा विषय मागे राहायचाच. अनेकदा यशाने हुलकावणी दिली तरीही वडिलांच्या आग्रहानुसार कृष्णा परीक्षा देत राहिला. अखेर यंदा कृष्णाच्या प्रयत्नांना यश आले.
यंदा गणित विषयात ३५ गुण मिळवत कृष्णा दहावीत पास झाला. यासोबत दहा वर्षांच्या मेहनतीने त्याला ४९ टक्के मिळाले आहेत. तालुक्यातील टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल डाबी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत कृष्णाची वाजत गाजत मिरवणूक काढली. यासोबतच वडील नामदेव मुंडे यांनीही आपल्या मुलगा मोठ्या प्रयत्नाने दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.