एसटी कामगारांचे उपोषण : परळी बस आगारातून एकही बस सोडली नाही, प्रवासी खोळंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 12:52 PM2021-10-28T12:52:30+5:302021-10-28T13:00:22+5:30
ST Bus Employee Hunger Strike: एसटीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही.
परळी ( बीड ) : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्यावतीने 27 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण ( ST Bus Employee Hunger Strike: ) सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून परळी येथे एसटी कामगारांनीही गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. एसटीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज आगारातून एकही बस सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा ,राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उ चल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी ,दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज पहाटे 4.30 वाजेपासून परळी आगारातील गेटवर कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज परळी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. सर्व युनियनचे सदस्य उपोषणात सामील झाले आहेत.
संयुक्त कृती समितीच्यावतीने मुंबई येथे चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून परळी आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग अवलंबिण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे नेते रमेश गीते यांनी दिली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे माजी संचालक भाजप नेते फुलचंद कराड ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनी यांनी उपोषणस्थळी भेट दिली.