एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:38 AM2021-09-15T04:38:43+5:302021-09-15T04:38:43+5:30
बीड : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सध्या विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अगोदरच वेळेवर वेतन मिळत नाही. त्यातच ...
बीड : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सध्या विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अगोदरच वेळेवर वेतन मिळत नाही. त्यातच आता वैद्यकीय बिलेही वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले आहे. निधीचा तुटवडा असल्याने बिले थकल्याचा दावा रापमने केला आहे. यात मात्र कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
कोरोनाकाळात रापमच्या सर्वच बस अनेक महिने जागेवरच उभा होत्या. त्यामुळे रापम तोट्यात गेले. आता कशातरी बस सुरू झाल्या असून परिस्थिती पूर्ववत होत आहे. त्यामुळे रापमची तिजोरीही भरत आहे. याचा फायदा वेतनावर होत आहे. गत काही महिन्यांत वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांच्या होत्या; परंतु आता नियमित वेतन होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी वैद्यकीय बिलांबाबत तक्रारी वाढतच आहेत. कोरोना काळातील बिले मागील अनेक महिन्यांपासून मिळालेली नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनातील बिलांचा समावेश
रापममध्ये अडकलेली सर्व बिले ही कोरोनाकाळातील व कोरोना आजाराची असल्याचे सांगण्यात येत आहे. अगोदरच मृत्यूच्या दारातून परत आलेल्या कर्मचाऱ्यांना आता बिलांसाठी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.
--
वेतन वेळेवर दिले जात आहे. वैद्यकीय बिलांना निधी नसल्यानेच अडचणी येत आहेत. साधारण ७० ते ८० लाख रुपयांची बिले देणे बाकी आहेत. ही सर्व बिले कोरोनाकाळातील आहेत. निधी नसल्याने ही बिले थांबली आहेत.
नारायण मुंडे, लेखाधिकारी रापम बीड
---
जिल्ह्यातील एकूण आगार ८
चालक ९४७
वाहक ११०३
अधिकारी २९