एस.टी. बसमध्ये मास्क लावण्याकडे दुर्लक्षच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:49+5:302021-08-02T04:12:49+5:30
अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त ...
अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. तशी सूचनाही एस. टी. च्या दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे; मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष होत असून अनेक प्रवासी विनामास्कनेच प्रवास करताना दिसून येत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करुन जनजीवन ठप्प झाले होते. या लाटेत सर्वात जास्त ग्रामीण भागात नुकसान दिसून आले. लहान लहान गावे हॉटस्पाॅट ठरली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या. कोरोना जनजागृती करण्यासाठी मोठे ठळक बॅनर, फलक, बसच्या मध्यभागी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ अशा मार्गदर्शक सूचना लिहिल्या आहेत. तरीदेखील काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही तर काही जणांचा मास्क हनुवटीवरच लावलेला असतो.यामुळे या सूचनांकडे नागरिक तसेच प्रवाशांचे दुर्लक्ष होत असून त्यांना गांभीर्य दिसून येत नाही. कोरोनामुळे मोठी हानी होऊनही यातून आपण अजून काहीच बोध घेतला नाही असेच म्हणावे लागेल.
कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच आपण या महामारीला हरवू शकू, कोरोनावर मात करु शकतो. जवळ जवळ दोन महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. सेवा चालू झाली आहे.
यात प्रत्येक प्रवाशांनी जवळ मास्क, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक देखील करण्यात आले आहे. मात्र या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही. यासाठी कडक अंमलबजावणी करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.