ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:12+5:302021-09-02T05:12:12+5:30
माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू ...
माजलगाव : तालुक्यात मागील साडेतीन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्यावर येथील आगारातून ग्रामीण भागासाठी लालपरी सुसाट धावत असली, लालपरी मुक्कामाला कधी जाणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
गतवर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे ग्रामीण भागात अनेक महिने बससेवा बंद करण्यात आली होती. नंतर ऑगस्टमध्ये सुरू झालेली बससेवा फेब्रुवारीपर्यंत सुरळीत सुरू झाली होती. त्यानंतर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होताच मार्चमध्ये ही बससेवा पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आली. ७ जूनपासून केवळ शहरी भागात बससेवा सुरू करण्यात आली होती, परंतु ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या सुरुवातीपासून जास्त असल्याने बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने, येथील तालुक्यातील अनेक गावात हळूहळू बससेवा सुरू झाली. सध्या तालुक्यातील कवडगाव व जवळा ही गावे वगळता ग्रामीण भागातील सर्वच गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे ७०-८० गावच्या प्रवाशांचा इतर शहरांशी संपर्क जोडला जात असला, तरी मुक्कामी गाड्या सुरू झालेल्या नाहीत.
-----
१) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल
माजलगाव आगारातून जवळपास सर्वच तालुका व जिल्ह्याशी जोडणाऱ्या बस सुरू करण्यात आल्या आहेत. इतर शहरांच्या मानाने लातुर व कोल्हापूर बस एकदम फुल्ल जात असून, या शहराला जाणाऱ्या गाड्यांचे उत्पन्नही सर्वात जास्त आहे.
--------
२) ग्रामीण भागातील बसेसमध्ये जागा मिळेना
इतर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणच्या बस सध्या सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील इतर गावांच्या तुलनेत पुरुषोतमपुरी, गुंजथडी व आबेगाव मार्गावरील बसमध्ये जागा मिळत नसल्यची स्थिती आहे. यामुळे आगारास या गावापासून चांगलाच फायदा होताना दिसत आहे. प्रत्येक गावाला २-२ फेऱ्या सध्या सुरू आहेत.
--------
मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय?
माजलगाव आगाराकडून यापूर्वी सहा ठिकाणी मुक्कामाला बस जात असे, परंतु आता केवळ कोयाळ व पुंगणी याच गावांना मुक्कामाला बस जात आहे. सतर मुक्कामी बसेस सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
-------
मुक्कामी गाड्या नसल्याने त्रास
यापूर्वी आमच्या गावात बस अनेक फेऱ्या करत असल्याने आम्हाला इतर गावांना जाण्यासाठी अडचण येत नसे, परंतु आता केवळ दोनच फेऱ्या सुरू असल्याने इतर ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत आहेत.
- वैजनाथ कटके, रामगाव.
-----------
सध्या आमच्या गावात बसच्या केवळ दोनच फेऱ्या होत असून, त्याही वेळेवर येत नसल्याने आम्हाला इतर गावाला जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मला अर्धे तिकीट असतानाही अवैध प्रवासी वाहतूक गाड्यांमध्ये जाण्याची वेळ येत आहे, यामुळे मला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
- रामभाऊ खाडे, मोठेवाडी.
----------
बसच्या दोन फेऱ्या सुरू
सध्या माजलगाव आगारातून केवळ २-३ गावे वगळता इतर ठिकाणी बसच्या २-२ फेऱ्या सुरू करण्यात आल्या व इतर शहरांच्या ठिकाणच्या सर्वच फेऱ्या सुरू करण्यात आल्याने उत्पन्नही ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
- दत्तात्रय काळम पाटील, आगार प्रमुख, माजलगाव.
-------------