एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:37 AM2021-09-23T04:37:51+5:302021-09-23T04:37:51+5:30
बीड : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गावोगावच्या संपर्काच्या वाटा बंद झाल्या. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ...
बीड : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गावोगावच्या संपर्काच्या वाटा बंद झाल्या. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची चाके आगारातच रुतलेली होती. दुसऱ्या अनलॉकनंतर काही महिने मर्यादित मार्गावर सेवा सुरू झाली. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने ही सेवा बंद करावी लागली. त्यानंतर पुन्हा तिसरे अनलॉक झाल्यानंतर लालपरी रस्त्यावर धावू लागली. सुरुवातीला लांब पल्ला, मोठी शहरे अशी वाहतूक सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातही काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली. मागील आठवड्यात परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बससेवा सुरू झाली. बीड विभागातून सध्या फक्त अंबाजोगाई आगारातून हैदराबादला जाण्यासाठी दोन बसेसची सुविधा उपलब्ध असून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्देशानुसार इतर राज्यांत जाण्यासाठी जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. हैदराबाद सुरू झाली, आता गुलबर्गा, बीदर, विजयपूर, सुरत, इंदौरसाठी बस केव्हा सुरू होणार, याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
बीड विभागातून परराज्यात जाणाऱ्या बसेस
अंबाजोगाई - हैदराबाद व हैदराबाद - अंबाजोगाई
२) सध्या जिल्ह्यातील आठ आगारांपैकी केवळ अंबाजोगाई येथून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी हैदराबाद बस सुविधा उपलब्ध आहे. एक बस सकाळी तर दुसरी रात्री निघते. मार्गावरील लातूर, बसवकल्याण भागातील प्रवाशांची या बसमुळे सोय झाली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणारे बहुतांश प्रवासी आसन आरक्षित करून प्रवास करीत आहेत. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून कधी कधी बस फुल्ल होते.
३) ७५ टक्के वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यात एकूण २८५१ पैकी ७०० चालक, ८०८ वाहक, ३५६ यांत्रिकी व प्रशासनातील २५० अशा २११४ कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
४) लस न घेतलेल्या वाहक-चालकांना इतर राज्यांत नो एन्ट्री
शासनाच्या निर्देशानुसार लस न घेतलेल्या वाहक - चालकांना इतर राज्यांत प्रवेश नाही. त्यामुळे अंबाजोगाई आगारातील लसीकरण झालेल्या चालक, वाहकांना हैदराबादची ड्यूटी दिली जाते. ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या लसीकरणामुळे अडचणी नसल्याचे सांगण्यात आले.
५) अंबाजोगाई ते हैदराबाद या दोन बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून सीझनमध्ये या बस पूर्ण क्षमतेने चालतील. परराज्यातील बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली असून महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. इतर राज्यातही बसेस सुरू करण्याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव दिलेला आहे. मंजुरीनंतर पुढील कार्यवाही होईल. - अजयकुमार मोरे, विभाग नियंत्रक, रापम, बीड.
६) बीड विभागातून रापमच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे सोळा नियतांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तेलंगणा राज्यासाठी बीड ते हैदराबाद, अंबाजोगाई ते हैदराबाद अशा एकूण चार नियतांचा प्रस्ताव आहे. तर कर्नाटकमध्ये जाण्यासाठी बीड ते बीदर, बीड ते विजयपूर, बीड ते गाणगापूर, बीड ते गुलबर्गा, अंबाजोगाई ते बीदर आणि धारूर ते विजयपूर अशा १२ नियतांचा प्रस्ताव आहे. प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रवासी सेवा सुरू होऊ शकते.