अनेक वर्षानंतर फिटणार दैना! रखडलेल्या साबलखेड-चिंचपूर रस्ता कामास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:36 PM2023-04-04T14:36:23+5:302023-04-04T14:36:42+5:30
या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
- नितीन कांबळे
कडा (बीड) : साबलखेड-चिंचपूर रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून जागोजागी खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर दररोज अपघात घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या रस्त्याचे भाग्य उजळे असून अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने रखडलेल्या साबलखेड-चिचपुर या १३० कोटीच्या रस्ता कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती अभियंता आर.व्ही भोपळे यांनी लोकमतला दिली. 'लोकमत'ने सातत्याने या मार्गाच्या दुरुस्थितीसाठी पाठपुरावा केला आहे.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्ग हा आष्टी तालुक्यातील कडा-साबलखेड -धानोरा-वाघळुज या मार्गे जातो. काही वर्षापुर्वी नगर ते साबलखेडपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. पण तेथून पुढे चिंचपूरपर्यंत निधी नसल्याने काम थांबवले होते. त्यामुळे२० किमीचे हे अंतर वाहकांसाठी जिवघेणे ठरत होते.
कोणता खड्डा चुकावा हेच चालकाला समजत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. तर जखमींचाही आकडा मोठा आहे. आता या रस्ता कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून प्रवाशी, वाहनचालकांची दैना फिटणार आहे.
दीड वर्षांत पूर्ण होईल
रस्त्याच्या कामाला सोमवारपासून सुरवात झाली असून दर्जेदार काम करण्यात येणार आले. साधारण दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर.व्ही.भोपळे यांनी दिली.