१५ वर्षांनंतर खांद्यावर उपनिरीक्षकपदाचे 'स्टार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:40 AM2021-09-24T04:40:04+5:302021-09-24T04:40:04+5:30
बीड : पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या दोघांनी खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली. जिद्द, चिकाटीला यशाची ...
बीड : पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या दोघांनी खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली. जिद्द, चिकाटीला यशाची जोड मिळाली, परंतु निवडीनंतर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. अखेर १५ वर्षांनंतर राज्यातील १३ हवालदारांच्या खांद्यावर उपनिरीक्षकपदाचे 'स्टार' चमकणार आहेत. बीड पोलीस दलातील दोन हवालदारांचा यात समावेश आहे.
पोलीस खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदासाठी २००६मध्ये मुख्य परीक्षा झाली होती. उमेदवारांची आरक्षणानुसार निवड यादी जाहीर केली होती. यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अधिक गुण मिळूनही निवड यादीत स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी आक्षेप नोंदविला होता. शिवाय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट बनल्याने राज्यातील १३ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले होते.
यात बीडमधील हवालदार रमेश दुबाले व हनुमंत इंगळे यांचा समावेश आहे. दुबाले हे माजलगाव ग्रामीण ठाण्यात, तर इंगळे हे पिंपळनेर ठाण्यात कर्तव्यावर आहेत. न्यायाधिकरणाने अखेर १३ उमेदवारांची निवड ग्राह्य धरून त्यांना उपनिरीक्षकपदाच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार २७ सप्टेंबरपासून नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत या १३ जणांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी २२ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले.
.....
230921\23bed_16_23092021_14.jpg~230921\23bed_17_23092021_14.jpg
रमेश दुबाले~हनुमंत इंगळे