चारा छावण्या सुरू करा, अन्यथा मंजुरी होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:40 AM2019-03-23T00:40:16+5:302019-03-23T00:41:32+5:30
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी छाननी करुन आवश्यक तेथे मंजुरी देण्यात आली आहे.
बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्यांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी छाननी करुन आवश्यक तेथे मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू न झाल्यामुळे त्या परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मंजूर असूनही चारा छावण्या सुरू न केलेल्यांना ७ दिवसांचा वेळ दिला आहे. छावण्या सुरू न झाल्यास त्या छावण्यांची मंजुरी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ८०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पैकी फक्त २६५ चारा छावण्या कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी आवश्यकता असताना देखील अनेक चालकांनी चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे इतर गावातील छावण्यांवर जनावरं नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. मंजूर असलेली छावणी तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी देखील चारा छावण्या सुरू करण्यासाठी ७ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर जर छावणी सुरू नसेल तर छावणीची मंजुरी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मागील अनुभव लक्षात घेता यावेळी डिजिटल पद्धतीने जनावरांची मोजदाद केली जाणार आहे. त्यानुसारच छावणीची देयके अदा केली जणार आहेत. डिजिटल पद्धतीने मोजणी झाल्यामुळे गैरप्रकार टाळण्यास मदत होणार आहे.
दुभत्या जनावरांवर परिणाम
जिल्ह््यातील बहुतांश शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीला जोडून दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन करतात. काही भागात दुधापासून बनवलेला खवा हा देशातील अनेक शहरात जातो. चारापाण्याची कमतरता व छावण्यांमध्ये मिळत असलेले पशुखाद्य संतुलित दुभत्या जनावरांवर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी दिल्या.