योगेश्वरी देवीच्या आरतीने प्रचारास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:57 PM2019-10-10T23:57:25+5:302019-10-10T23:59:24+5:30
नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई शहरातील प्रचाराचा शुभारंभ बुधवारी दुपारी अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात महाआरती व श्रीफळ फोडून करण्यात आला.
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, रयत क्रांती परिषद व रासप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या विजयासाठी अख्खी तरूणाईच रस्त्यावर उतरल्याचे चित्र आज दिसून आले. निमित्त होते नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाईतील प्रचार शुभारंभाचे. नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई शहरातील प्रचाराचा शुभारंभ बुधवारी दुपारी अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात महाआरती व श्रीफळ फोडून करण्यात आला.
नमिता अक्षय मुंदडा यांच्या अंबाजोगाईतील ‘डोअर-टू-डोअर’ प्रचाराला बुधवारपासून सुरुवात झाली. स्व. डॉ. विमल मुंदडा यांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून मतदारसंघाचा कायापालट केला. हीच परंपरा पुढे चालवत मतदार संघाच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प करत असल्याचे भावनिक आवाहन नमिता मुंदडा यांनी यावेळी केले.
श्री योगेश्वरी देवीचा आशीर्वाद घेऊन सुरू झालेल्या या रॅलीमध्ये महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. विशेषत: या रॅलीममध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. उच्चशिक्षित नमिता निवडून आणण्याचा पक्का निर्धार केल्याचे यावेळी तरूणांनी सांगितले. मंडीबाजार, पाटील चौक, कुत्तर-विहीर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी ही प्रचार फेरी काढण्यात आली.
ठिकठिकाणी मतदारांनी नमिता यांचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नमिता मुंदडा यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
याप्रसंगी उमेदवार नमिता मुंदडा, बाळासाहेब दोडतले, शेख रहीम, उपनगराध्यक्षा सविता अनंत लोमटे, राम कुलकर्णी, जनार्दन मुंडे, कमलाकर कोपले, तानाजी देशमुख, सारंग पुजारी, अर्जुन वाघमारे, गजानन मुडेगावकर, संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, शेख ताहेर, खलिल मौलाना, बालाजी पाथरकर, राजकुमार गंगणे, विनोद पोखरकर, नूर पटेल, संतोष लोमटे, बबलु सिद्दीकी, महादू मस्के, हनुमंत तौर, संजय जोगदंड, दयावान मुंडे, शैलेश कुलकर्णी, सुजित दिख्खत, डॉ. गोपाळ चौसाळकर, डॉ. सुधीर धर्मपात्रे, नितीन पाठक, उषा यादव, सुरैय्या चौधरी यांच्यासह महिला व तरुण कार्यकर्ते या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.
‘विमलतार्इंच्या नेतृत्वाचा विसर पडणार नाही
ज्या पद्धतीने डॉ. विमल मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघास आपले कुटुंब मानून सेवा केली. त्यांचा वसा पुढे आपण अखंडित सुरू ठेवून जनसामान्यांची सेवा करणार आहोत, अशी ग्वाही नमिता मुंदडा यांनी याप्रसंगी देऊन आश्वासन दिले.
मुंदडा कुटुंबियांवर जनतेचा जो विश्वास आहे. तो आगामी काळातही सार्थ ठरविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मतदारसंघ हे कुटुंब मानून कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे प्रत्येकाचे प्रश्न व समस्या सोडवून या भागाचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे काम करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.