अंबाजोगाईत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:56 PM2019-07-12T23:56:34+5:302019-07-12T23:57:35+5:30
तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट केल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
अंबाजोगाई : तालुक्यातील चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शुक्रवारी दुपारी सव्वा बारा ते पावणे दोनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट केल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी, केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती, विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाई अंतर्गत चनईतांडा व दगडुतांडा या दोन ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती केंद्रांवर धाडी टाकून २ गुन्हे नोंदवले. सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत. महाराष्ट्र दारू बंदी कायद्यातंर्गत दोन्ही ठिकाणी बेवारस दोन गुन्हे नोंदविले आहेत. टाकलेल्या धाडीत चनईतांडा व दगडुतांडा येथे बेवारस स्थितीत ५ हजार ९७५ लिटर रसायन, १५ लिटर तयार हातभट्टी दारू, पाण्याची टाकी,२०० लिटरचे २७ बॅरल, पाच डब्बे, चार टोपली, दोन चाटु असा एकूण १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड, बि.के. पाटील, आर.ए. जारवाल, चालक के.एन.डुकरे हे सहभाग होते.