नुकसानग्रस्तांना मदतीऐवजी राज्य सरकारकडून घोषणांची 'अतिवृष्टी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 03:48 PM2021-09-10T15:48:30+5:302021-09-10T15:51:20+5:30
Rain in Beed : जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे.
आष्टी ( बीड ) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे ( Heavy rain in Beed ) अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचानामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांना काहीच लाभ मिळाला नाही. सरकारकडे आमदाराचे फंड देण्यासाठी पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. हे सरकार केवळ घोषणांची अतिवृष्टी करत असल्याची टिका आ. सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी ५० मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून १३ मंडळामध्ये पावसाचे कमी प्रमाण आहे. ५० मंडळामध्ये जेवढी पेर झाली ते सर्व पिक आता पाण्याने सडले आहे. आष्टी तालुक्यातील ६ मंडळ अतिवृष्टी झाली असून पाटोदा, शिरुर कासार भयानक परिस्थिती आहे. ५० मंडळामधील क्षेत्र सरसकट नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. या भागातील शेतक-यांच्या हातात नाही सापडणार नाही. कापूस, तुर, कांदा, पिकांचे सडून अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे करणारे अधिकारी नदीच्या कडेने फिरतात. नुकसान भरपाई कोकणच्या धर्तीवर द्यावी. ई - पिक पाहणी नको, पंचनामे कशासाठी जिल्हाधिकारी यांनी सरसकट नुकसान झाल्याचा अहवाल द्यावा.
पिक विम्यावरील शेतक-यांचा विश्वास उडाला आहे. मागिल वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी विमा भरलेलाच नाही. पिक विम्याचे नाटक आणू नये. सरसकट राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा मोबाईल वाजायचा बंद झाला. शेतक-यांना पिक विमा,अनुदान, मिळालेच नाही. मोदी सरकारच्या किसान सन्मान या योजनेचा २ हजार रुपये हप्ता आला तरच मोबाईलची टोन वाजत आहे. या राज्य सरकारच्या काळात सर्व काही बंद झाले. १ रुपयाचा लाभ नाही, सत्ता टिकवण्यासाठी आमदाराचे फंड देण्यासाठी निधी आहे. पण नुकसान भरपाई देण्यासाठी पैसा नाही. सरकार घोषणांची 'अतिवृष्टी' पाडत असल्याची टीका त्यांनी केली.