बीड - नगर रेल्वेसाठी राज्य शासनाकडून ७७ कोटीचा निधी रेल्वे बोर्डास वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 01:42 PM2017-11-18T13:42:29+5:302017-11-18T13:42:45+5:30
परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डा वितरित केला आहे. यासंबंधी आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत.
बीड : परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डाकडे वितरित केला आहे. यासंबंधी आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत.
परळी - बीड - नगर या रेल्वे मार्गाकरिता २८२६ कोटी रु पये एवढा खर्च अंदाजित असून यातील १४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळ स्तरावर घेतला आहे. त्यानुसार या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने आॅक्टोबर २०१७ पर्यंत एकूण ६३९ कोटी ६४ लाख रु पये निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठी याच कालावधीत रेल्वे विभागाने ७१६ कोटी ८४ लाख रु पये इतका निधी वितरित केला आहे.
राज्य शासनाच्या हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१७-१८ करिता प्रकल्पासाठी तरतूद झालेल्या निधीपैकी ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. यामुळे केंद्र व राज्य शासनाचे मिळून आतापर्यंत १४३३ कोटी ६८ लाख रुपये या प्रकल्पाला मिळाले आहेत. या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून २०१९ पर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्णत्वास येणार आहे. हा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला असून तसे आदेश गृह विभागाने निर्गमित केले आहेत.