प्रदेशाध्यक्षांनीच ठरविले ‘रेट’; क्लिप व्हायरल
By Admin | Published: January 15, 2017 10:55 PM2017-01-15T22:55:29+5:302017-01-15T22:59:06+5:30
बीड : एमआयएममध्ये उभी फूट पडली असतानाच शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या समोरच प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केला.
येथील पालिकेत उपनगराध्यक्षपदाच्या पाठिंब्यावरून एमआयएममध्ये उभी फूट पडली असतानाच शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या समोरच प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर सौदेबाजीचा आरोप केला. त्याची व्हिडिओ क्लिप रविवारी ‘व्हायरल’ झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
बीड पालिकेत एमआयएमचे नऊ नगरसेवक आहेत. त्यापैकी ७ जणांनी स्वतंत्र गट स्थापन करून काकू-नाना विकास आघाडीला उपनगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आ. इम्तियाज जलील यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन फुटीर नगरसेवकांना पक्षादेश डावलल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड दम भरला. तत्पूर्वी, शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी फुटीरवादी पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. व्हिडिओ क्लिपमध्ये डॉ. इद्रिस हाश्मी यांनी पक्षाला घरचा आहेर देताना प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यावर टोकाचे आरोप केले. प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही क्षीरसागरांकडून पाठिंब्यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करण्यास सांगितले. स्थानिक पातळीवर आघाडीला पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यानंतर मोईन यांनी माझा फोन घेतला नाही. आमच्यावर विकले गेल्याचा आरोप केला जातो; मात्र ज्यांनी हा सल्ला दिला, त्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष का हटवीत नाही, असा सवालही इद्रिस यांनी उपस्थित केला. आम्हाला समाजाचे काम करायचे आहे. आम्ही प्रामाणिकपणे ते करीत आहेत. मात्र, आमच्यावर नाहक आरोप होत आहेत. त्यात तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला. डॉ. हाश्मी यांच्याशी संपर्क साधला असता तो आमचा अंतर्गत विषय आहे, त्यावर आताच बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलून कट केला. त्यानंतर वारंवार संपर्क साधूनही भ्रमणध्वनी उचलला नाही. (प्रतिनिधी)