उत्पन्न कणभर आणि खर्च मणभर... अशी शेतकऱ्यांची अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:06+5:302021-05-17T04:32:06+5:30
राजेश राजगुरु लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : शेती उत्पन्नात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या किमती सर्वच कंपन्यांनी जवळपास दुपटीपर्यंत वाढवल्या ...
राजेश राजगुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
तलवाडा
: शेती उत्पन्नात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या किमती सर्वच कंपन्यांनी जवळपास दुपटीपर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे संकटावर संकटे झेलत असलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पन्न कणभर आणि खर्च मणभर... अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसत आहे.
२०१२ सालापासून शेतकऱ्यांवर एकापेक्षा एक वरचढ संकटे येत आहेत. या जवळपास नऊ वर्षांत एकही वर्ष शेतकऱ्यांना म्हणावे असे उत्पन्न देऊ शकलेले नाही. सलग तीन-चार वर्षांचा दुष्काळ. त्यानंतर पाऊसच पाऊस. सलग तीन वर्षे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे ऊत्पन्न घटले. इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले. त्यातही शेती फसली तरी कसावीच लागते. असे म्हणत शेतकरी पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला. पण खरीप अवघ्या महिनाभरावर आले असताना बी-बियाणांची चिंता करताना खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा कोलमडणार आहे.
...
क्विंटलभर खताला द्यावे लागणार धान्याचे दोन क्विंटल, तर उसाचे दोन टनाचे माप
धान्यासह शेतीमालाचा विचार करता मोठी तफावत दिसत आहे. ज्वारी, बाजरी, गहू विकून खते घ्यायचे म्हटले तर क्विंटलभर खतासाठी शेतकऱ्यांना दोन क्विंटल धान्याची किंमत अदा करावी लागणार आहे. कापूस, सोयाबीन ही पिकांचेही क्विंटलभराचे माप द्यावे लागणार आहे. उसाची दोन टनाची किंमत अदा करावी लागणार आहे.
...
केंद्राने दिले दोन हजार.. वसुली मात्र लाखात
केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा २००० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. लगेचच खतांचे दर वाढवून वसुलीच्या तयारीला लागल्याचे संकेतही दिले आहेत. खत, बियाणे खरेदीसाठी पैसे नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
...
असे वाढले खतांचे दर..
जुने दर नवे दर (क्विटंल- रुपयात)
ईफको १०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ ११९० १८००
२०:२०:०० ९७५ १३५०
डी.ए.पी. ११७५ १९००
आयपीएल
डी.ए.पी. १२०० १९००
२०:२०:०० ९७५ १४००
पोटॅश ८३० १०००
महाधन १०:२६:२६ १२७५ १९२५
२४:२४:०० १३५० १९००
२०:२०:०:१३ १०५० १६००
सरदार १०:२६:२६ ११७५ १७७५
१२:३२:१६ ११९० १८००
डी.ए.पी. १२०० १९००.