माजलगाव तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; शेलगावथडी येथे दोन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 06:04 PM2018-05-12T18:04:07+5:302018-05-12T18:04:07+5:30
तालुक्यातील शेलगावथडी या ठिकाणी आज पहाटे दोन घरे फोडली असुन यात सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाख रूपयाचा ऐवज चोरीस गेला.
माजलगांव (बीड ) : तालुक्यातील शेलगावथडी या ठिकाणी आज पहाटे दोन घरे फोडली असुन यात सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह साडेतीन लाख रूपयाचा ऐवज चोरीस गेला. माजलगाव तालुक्यातील चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात चोरांनी धुमाकुळ घातला आहे. शहरातील विविध भाग तसेच तालुक्यातील मंजरथ, सिमरी पारगंाव,लहामेवाडी येथे मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. मात्र या घटनांचा छडा लावण्यात माजलगाव पोलीस अपयशी ठरत आहेत. यामुळे तालुक्यात चोरीचे सत्र सुरुच आहे.
लहामेवाडी येथील चोरीची घटना ताजी असतांनाच आज पहाटे २ वाजेच्या दरम्यान चोरांनी शेलगांवथडी येथील शेतकरी विष्णू विठ्ठलराव तौर यांचे घर फोडले. यात ५८ हजार रुपये रोख व सोने-चांदीची दागिने असा दोन लाख २७ रुपयाचा ऐवज लंपास केला. यासोबत गोपीचंद अशोक जाधव यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. कदम हे करत आहेत. तालुक्यातील चोरीच्या घटनांचे सत्र थांबत नसल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त होत आहे.