मुंबईत शिक्षकांवर लाठीमार, बीडमध्ये निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:11 AM2019-08-28T00:11:13+5:302019-08-28T00:12:06+5:30
वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
बीड : वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सहभागी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक संघटना समन्वय समितीने शिक्षकांवरील लाठीमाराचा निषेध केला. त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारुन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मराठवाडा शिक्षक संघाचे राजकुमार कदम, डी.जी.तांदळे, संस्था चालक महामंडळाचे दीपक घुमरे, मुख्याध्यापक संघाचे विष्णूपंत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून शिक्षकांवरील लाठीमाराचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दहा ते वीस वर्षे विनावेतन काम करणाºया शिक्षकांना वेतन देण्याऐवजी लाठीमार करण्यात आला.
ही लांच्छनास्पद बाब आहे. या शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अनेक शिक्षक एक रु पया ही वेतन न घेता सेवानिवृत्त झाले आहेत.
कायम शब्द काढलेल्या सुमारे चार हजार शाळांवर कार्यरत सुमारे पन्नास हजार शिक्षकांना शंभर टक्के अनुदानाची तरतूद करावी. लाठीमार करणा-या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. कालिदास धपाटे, गणेश आजबे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, उत्तमराव पवार, गोविंदराव वाघ, प्रा. मारूती वाघमारे, बी.टी.खाडे, जयदत्त सुद्रुक यांच्यासह शेकडो शिक्षक निदर्शनात सहभागी झाले होते.