गुटखा माफिया मुळे अद्याप मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:35+5:302021-09-19T04:34:35+5:30
बीड : तालुक्यातील घोडका राजुरी फाट्यावर १५ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गोदामावर छापा टाकून ...
बीड : तालुक्यातील घोडका राजुरी फाट्यावर १५ सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजता पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गोदामावर छापा टाकून सुमारे ६२ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद असून माफिया महारुद्र मुळे हा मात्र अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.
महारुद्र मुळेसह गोदाम मालक बालासाहेब घोडके, ट्रकचालक सोमनाथ वारे, दिलीप घोडके व मालवाहू जीपचालक रंगनाथ खांडे यांच्यावर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी दोन वाहनचालक जेरबंद असून उर्वरित तिघे फरार आहेत. दरम्यान, दोन दिवस उलटूनही माफिया महारुद्र मुळेच्या मुसक्या आवळण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आलेले नाही. त्याच्यावर यापूर्वी मार्च महिन्यात पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांच्या ताब्यातून गुटख्याचा टेम्पो पळविल्याचे हे प्रकरण होते. विशेष पथकाने केजमध्ये दाेन ठिकाणी छापे टाकून पकडलेल्या लाखोंच्या गुटख्याचे धागेदोरेही महारुद्र मुळेपर्यंत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
...
राजकीय कनेक्शन, कारवाईत लुडबूड
पथकप्रमुख विलास हजारे यांनी महारुद्र मुळेच्या गोदामावर छापा टाकल्यावर काही राजकीय नेत्यांनी कारवाईत लुडबूड करण्याचा प्रयत्न केला. एका लोकप्रतिनिधीचा स्वीय सहायक पिंपळनेर ठाण्यात विघ्नहर्ता म्हणून आला होता. मात्र, त्यास हजारेंनी जुमानले नाही. एका जिल्हाप्रमुखालाही त्यांनी दाद दिली नाही. यातून मुळेचे सगळ्याच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांशी कनेक्शन असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
....फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या घरी जाऊन शोध घेतला,पण ते मिळून आले नाही. त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- बाळासाहेब आघाव, सहायक निरीक्षक, पिंपळनेर ठाणे