बीडमध्ये चेकपोस्टचे ‘स्टिंग ऑपरेशन’; प्रवास्यांना पैसे मागणारे ३ पोलीस निलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 08:24 PM2020-05-16T20:24:13+5:302020-05-16T20:25:09+5:30
काही चेकपोस्टवर पैसे घेऊन प्रवेश दिला जात असल्याची चर्चा होत होती. तसेच प्रवासी नागरिकांची कागदपत्रे योग्यरित्या तपासली जात नव्हती.
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या जिल्ह्यातील काही चेकपोस्टवर डमी प्रवासी पाठवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच स्टिंग ऑपरेशन केले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: अपर पोलीस अधीक्षक विजय काबाडे यांनी काही चेकपोस्टवर डमी प्रवासी पाठविले. यावेळी पैसे मागणाऱ्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रयोगामुळे मात्र सर्वच चेकपोस्टवर कसून तपासणी सुरु झाली आहे.
जिल्ह्याच्या चारही बाजुने लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर कर्तव्य बजावत आहे. अवैधरित्या व चोरट्या मार्गाने प्रवेश इतर जिल्ह्यातून होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात २३ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. याठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक आणि महसूल प्रशासनाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही चेकपोस्टवर पैसे घेऊन प्रवेश दिला जात असल्याची चर्चा होत होती. तसेच प्रवासी नागरिकांची कागदपत्रे योग्यरित्या तपासली जात नव्हती. चिरीमिरी घेऊन जिल्ह्यात प्रवेश दिला जात होता. ही चर्चा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देखील पोहचली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ मुळे चेकपोस्टवर खाबुगिरी व कामचुकार करणाऱ्यांमध्ये जरब बसली असून, प्रवेश देताना कसून चौकशी केली जाणार आहे. नागिरकांनी देखील प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही करवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले.
पास नसताना दिला प्रवेश, पैशाचीही मागणी
अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी १५ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान शहागड ते खामगांव चेकपोस्टवर डमी प्रवासी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पाठवले होते. यावेळी त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पास नसताना प्रवेश दिला. त्यामुळे येथे कर्तव्यावर असलेल्या पोह एम.के.बहीरवाळ, डी.बी.गुरसाळेत, पोना एस.बी.उगले यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले.
कामचुकारपणा तिघांना भोवला
चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतल चेकपोस्टवर शेवगावकडे जात असताना कर्मचाऱ्यांनी चौकशी केली नाही. त्यामुळे पोना.बी.बी. लोहबंदे, पोना ए.के. लखेवाड, एस.एस.वाघामारे यांना प्रत्येकी ३ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना दिले बक्षीस
मातोरी येथील चेकपोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातून प्रवेश करत असताना, कर्मचाऱ्यानी कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रवेश करण्यास मनाई केली. यामुळे या कर्मचाऱ्यांचे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले असून, पोह.डी.एम.राऊत पोना. डी.एम.डोंगरे, पोशि.टी.यू पवळ यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.
डमी प्रवाशांना परत पाठविले
अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गंत दौलावडगांव येथील चेकपोस्टवर डमी प्रवासी प्रवेशासाठी गेले असता, तेथे चौकशी करून त्यांना परत पाठवण्यात आले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोह. एस.ए.येवले, पोह. व्ही.एस.माळी यांना देखील प्रत्येकी ५ हजार रुपये बक्षीस मंजूर करण्यात आाले आहे.