बीड जिल्ह्यात पाण्यावरून एकाचा दगडाने ठेचून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:03 PM2017-11-20T23:03:32+5:302017-11-20T23:03:40+5:30
माजलगाव : सामायिक बोअरचे पाणी घेण्यावरून शेजाºयांमध्ये वाद झाला. त्याचे भांडणात रूपांतर झाले. त्यानंतर चौघांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीला अक्षरश: रस्त्यावर दगडाने ठेचून जिवे मारले. ही खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
भागवत बाबुराव गायके (४०, रा. नित्रूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भागवत गायके व त्यांच्या शेताचे शेजारी बंडू डाके, शिवा डाके, दिनकर डाके, दत्ता डाके यांच्यामध्ये सामायिक बोअर आहे.
बोअरचे पाणी घेण्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. सोमवारी सकाळी याच पाण्यावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर डाके बंधूंनी गायकेवर हल्ला चढविला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत गायकेंनी पळ काढला; परंतु या चौघांनी त्यांचा पाठलाग करीत मुख्य रस्त्यावरच त्यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला.
ही घटना परिसरातील लोकांनी पाहिल्यानंतर दिंद्रूड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर ठाणे पोलीस निरीक्षक आसिफ सय्यद यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामाही करण्यात आला. त्यानंतर मयताची आई कौशल्या गायके यांच्या फिर्यादीवरून डाके बंधूंविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तपासासाठी तीन पथके रवाना
पाण्याच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आमचा तपास सुरूच आहे. दिनकर डाकेला ताब्यात घेतले आहे. इतरांच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत.
- आसिफ सय्यद
पोलीस निरीक्षक, दिंद्रूड ठाणे.