आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक
By सोमनाथ खताळ | Published: October 30, 2023 01:20 PM2023-10-30T13:20:44+5:302023-10-30T13:21:49+5:30
आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला.
बीड : राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून गाड्या व घरातील साहित्य जाळण्यात आले. त्यानंतर मराठा समाजबांधवांनी घोषणाबाजी करत माजलगाव शहरातील मुख्य मार्गांवरून रॅली काढली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. यामुळे माजलगाव शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद सोमवारी सकाळी उमटले. मराठा समाजबांधवांनी आक्रमक होत मोर्चा आ.सोळंके यांच्या घरावर नेला. तेथे समाजबांधवांनी दगडफेक केली. त्यानंतर घरात शिरून साहित्य बाहेर काढत घरालाच आग लावली. त्यानंतर बाहेर त्यांच्या गाड्याही पेटविण्यात आल्या. ही आग शमविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. परंतू आंदोलकांनी या गाड्या रस्त्यातच अडवल्या. त्यामुळे साहित्य व गाड्या आगीत खाक झाल्या.
Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या
दरम्यान, घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. यावेळी दगडफेकही करण्यात आली. आंदोलकांना रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. सध्या सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. पोलिसांचा फौजफाटाही अपुरा असून पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड: मराठा आरक्षण समर्थनार्थ माजलगाव बंद दरम्यान राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलकांची दगडफेक, गाड्या पेटविल्या. #MarathaReservationpic.twitter.com/ZOE5OQfU8J
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 30, 2023
काय म्हणतात प्रकाश सोळंके...
मी मराठा समाजाचा आमदार आहे. आरक्षण मिळावे, ही माझीच इच्छा आहे. परंतू काही लोक ऑडिओ क्लीप कट करून व्हायरल करत आहेत. राजकीय विरोधक या भावंनाचा गैरफायदा घेत आहेत. सकाळी आंदोलक आले तेव्हा मी घरातच होतो. सर्व बाजूने माझ्या घराला त्यांनी वेडा टाकला होता. काही चर्चा करण्याआधीच त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. राजकीय विरोधक संधी शोधून असे प्रकार करत असल्याची प्रतिक्रिया आ.प्रकाश सोळंके यांनी घरावरील दगडफेकीनंतर दिली.