माजलगाव नगर परिषदेकडून रहिवाशांच्या डोक्यात धोंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:39+5:302021-02-10T04:33:39+5:30
पुरूषोत्तम करवा माजलगाव : येथील नगर परिषदेकडून शहरातील जवळपास १४ हजार मालमत्ताधारकांना आपल्या घराचे मूल्यांकनानुसार वार्षिक भाडे ...
पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील नगर परिषदेकडून शहरातील जवळपास १४ हजार मालमत्ताधारकांना आपल्या घराचे मूल्यांकनानुसार वार्षिक भाडे मूल्य व कर आकारणीच्या अव्वाच्या सव्वा रुपयांच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नगरपालिकेच्या कुठल्याही शाळा सुरू नसतांना शिक्षण कर, शहरात वृक्षारोपण नसतांना वृक्ष कर, रोजगार कर, असे मनमानी पद्धतीने कर नागरिकांच्या माथी मारले असून नगरपालिकेने करापोटी जनतेच्या डोक्यात धोंडा घातल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
मागील कित्येक वर्षापासून म्हणजे १९७२ पासून माजलगाव नगरपरिषदेच्या हद्दी अंतर्गत असलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नव्हते त्यामुळे २०१७ साली अमरावती येथील कोअर प्रोजेक्ट या खाजगी कंपनीच्या वतीने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एकूण १३ हजार ७४९ मालमत्ता असल्याची नोंद आहे . या कंपनीच्या वतीने मूल्यांकनाचे काम ऑनलाईन पीटीआर पद्धत पूर्ण करण्यात आले आहे. त्याप्रमाणे शहरातील वरील १३ हजार ७४९ मालमत्ताधारकांना नोटीसा वाटप करण्यात येत आहेत. प्रतिमाह दर स्क्वेअर मीटर प्रमाणे निश्चित करून निर्धारित वार्षिक भाडे मूल्य २२ ते २५ टक्के वाढवण्यात आले आहे. या भाडे मूल्यावर रहिवाशांनी हरकत घेतल्या मात्र त्यावर नावालाच सुनावणी घेतली. हरकत घेणाऱ्याचे समाधान न करता आता पैसे भरण्याची नोटिसा देण्यात येत आहेत. या नोटिसामध्ये अनेक त्रुटी आहेत. पत्राच्या घरांना जादा कर तर स्लॅब असलेल्या घरांना कमी कर, घनकचऱ्याच्या ५०-५० रुपयांच्या एकाच व्यक्तीस दोन नोटीसा अशा अनेक त्रुटी दिसून येत आहेत.
एका रहिवाशास तर व्यापारी इमारतीस मालमत्ता कर ५७ हजार १७४ आला असून त्याच्या मुकबल्यात ५८ टक्के म्हणजे ३२ हजार ६९७ शिक्षण कर लावण्यात आल्याने त्या घरमालकाचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे. रोजगार कर १३ टक्के ७ हजार ६८६, वृक्षकर ५ टक्के २ हजार ५९९, घनकचरा व्यवस्थापन कर म्हणून ५० रुपयांच्या दोन वेगवेगळ्या पावत्या देण्यात आलेल्या आहेत. अशा अव्वाच्या सव्वा करामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या वार्षिक भाडे मूल्यावर १ ते १० टक्के शिक्षण कर व मालमत्ता करावर एक टक्का वृक्ष कर, त्याचप्रमाणे प्रती मालमत्ता घनकचरा पन्नास रुपये याप्रमाणे आणखी कर लावण्यात आले आहेत.
वार्षिक भाडे मूल्यावर आकारण्यात येणारा शिक्षण कर शहरात कोठेही नगरपरिषदेच्या शाळा नसताना व कोठेच वृक्षलागवड नसताना वृक्ष कर आकारण्यात येत असल्याने या सर्व कराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नगरसेवक गप्पच
नागरिकांना नगरपालिकेकडुन कोणतेही कर नागरिकांवर लावण्यात आले असतांना नागरिक नगरसेवकांना याबाबत विचारणा करत आहेत परंतु नगरसेवक याविरोधात काहीच बोलायला तयार नाही. यामुळे नगरसेवकांच्या विरोधात नागरिकांमधून रोष निर्माण झाला असून तोंडावर असलेल्या निवडणुकीत मत मागायला ये मग दाखवतो, असे नागरिकातून बोलले जात आहे.
या करामधील फक्त मालमत्ता कर नगर परिषदेकडे व उर्वरित सर्व कर शासनाकडे चलनाद्वारे भरण्यात येतो. शाळा जरी सुरू नसल्या तरी शासनाचा हा कर सर्वाना लागू आहे. -- विशाल भोसले ,मुख्याधिकारी