संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेतील लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:33+5:302021-03-19T04:32:33+5:30
तालुक्यातील अनेक लाभार्थी हे ऊसतोडणी करण्यासाठी बाहेर गावी गेले असल्याने कर्मचारी यांना सूक्ष्म तपासणी करण्यात अडचण निर्माण होत आहे. ...
तालुक्यातील अनेक लाभार्थी हे ऊसतोडणी करण्यासाठी बाहेर गावी गेले असल्याने कर्मचारी यांना सूक्ष्म तपासणी करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर तपासणीआडून लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. कोव्हिड-१९ च्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही, त्यातच सूक्ष्म तपासणीत अशिक्षित लाभार्थ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडून मिळणारे अनुदान थांबल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. मागील दोन वर्षांपासून संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेची बैठक झाली नसल्याने निराधारांचे हजारो प्रस्ताव धूळखात पडले आहेत. तहसीलदार यांनी तात्काळ बैठक घेऊन पात्र निराधारांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना अनुदान वाटप करावे. अनेक महिन्यांपासून निराधारांना अनुदान वाटप केले नाही. ते तात्काळ वाटप करून कोव्हिड-१९ च्या काळात निराधारांचे होत असलेले हाल थांबवावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पप्पू गायकवाड, सुदेश पोद्दार, प्रदीप तुरुकमारे, किशोर भोले, सतीश प्रधान, अजय खरात, रंजित शिंदे, नितीन खापरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.