बीड जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:15 AM2019-02-14T00:15:21+5:302019-02-14T00:16:14+5:30
जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे.
बीड : जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी अग्रीम रक्कम अदा करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी मंजुरी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान हंगामी वसतिगृहांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३० हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आल्याचे या मंजुरीवरुन स्पष्ट होत आहे.
बीड जिल्ह्यात समग्र शिक्षा अभियानंतर्गत यंदा शिरुर कासार तालुका वगळता दहा तालुक्यांत हंगामी वसतिगृहांना मंजुरी मिळाली होती. शिरुर तालुक्यात डीबीटीनुसार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. जिल्ह्यात १ डिसेंबरपासून वसतगिृहांना मंजुरी देण्यात आली होती.
वसतिगृहातील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी बायोमेट्रीकद्वारे उपस्थिती बंधनकारक होती. १२ जानेवारी रोजी एकाच दिवशी वसतगिृहांची तपासणी करण्यात आली होती. यात जवळपास ३ हजार विद्यार्थी अनुपस्थित आढळले होते. तपासणीतील उपस्थिती अहवालानुसार बिले काढणार असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच बजावलेले आहे. या नंतर राज्याच्या पथकाने तीन दिवसात विविध ठिकाणच्या हंगामी वसतिगृहांची तपासणी केली होती. हंगामी वसतिगृहांना अग्रीम मिळावे अशी मागणीही पुढे येत होती.
समग्र शिक्षा विभागाच्या वतीने १२ जानेवारीच्या विद्यार्थी उपस्थिती तपासणीचा अहवाल आणि अग्रीम बिल अदा करण्याबाबत प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केला होता. त्यानुसार मंगळवारी ८ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
बायोमेट्रीक यंत्राची अचानक तपासणी
बीड जिल्ह्यात दोन टप्प्यात ५९० हंगामी वसतिगृहांना मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात किती वसतिगृह सुरु झाले याचा तपासणी अहवाल आला. या अहवालानुसार ४८८ हंगामी वसतिगृहांना अग्रीम रक्कम विद्यार्थी उपस्थितीनुसार मिळणार आहे.
जानेवारीमध्ये राज्यस्तरीय पथकाने पाहणी केली असता बीड, वडवणी, गेवराई आणि आष्टी भागातील वसतिगृहांचे बायोमेट्रीक मॅन्युप्लेट असल्याचे दिसून आले. त्यामुळे बायोमेट्रीक यंत्राची तपासणी अचानक केली जाणार आहे.