अंबाजोगाईत रास्ता रोको; प्रकृती खालावलेले अनेक उपोषणार्थी इस्पितळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:14 PM2018-01-31T23:14:16+5:302018-01-31T23:14:29+5:30
जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व.डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. बुधवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. मुंदडा यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या समर्थकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
अंबाजोगाई : जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व.डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. बुधवारी उपोषणाचा पाचवा दिवस होता. मुंदडा यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या समर्थकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
येथील यशवंतराव चव्हाण चौकात मुंदडा समर्थकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे व समस्यांचे गांभीर्य प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याने समर्थकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तीन तास ठप्प होती.
केज मतदार संघातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अनेक निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे जनतेचे बेहाल होत आहेत. यासाठी डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचाच्या वतीने २७ जानेवारीपासून नंदकिशोर मुंदडा हे समर्थकांसह उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. परंतु प्रशासनाकडून या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी महारास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे अंबाजोगाई शहरातील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. रास्तारोको आंदोलनानंतर सर्व कार्यकर्ते उपोषणाच्या समर्थनार्थ उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.
रास्ता रोको आंदोलनात अक्षय मुंदडा, बाजार समितीचे सभापती मधुकर काचगुंडे, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, नगरसेवक शेख रहीम, संतोष शिनगारे, खलील मौलाना, शेख ताहेर, बालाजी पाथरकर, नेताजी शिंदे, अॅड. संतोष लोमटे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, गंगाधर ढोणे, राजेश व्हावळे, अजित सांगळे, वैजनाथ देशमुख, संतोष जिरे, बापू व्हावळे, योगेश कडबाने, बाबासाहेब शेळके, विशाल मुंदडा, अनंत आरसुडे, बळीराम चोपणे, बबलु सिद्दीकी, शेख जावेद, शेख तय्यब, दिग्विजय लोमटे, गौरव लामतुरे, मोमीन जरगर, गजेंद्र जाधव यांच्यासह विचारमंचचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
उपोषणाचा पाचवा दिवस
सलग पाचव्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरूच असून नंदकिशोर मुंदडा यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाच्या वतीने उपोषणाच्या संदर्भात व जनतेच्या न्याय मागण्यांबाबत उदासीनता जाणवू लागली आहे. या समस्यांबाबत गांभीर्याने ठोस उपाययोजना होत नसल्याने समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण
लोखंडी सावरगाव परिसरातील तयार इमारतीत तातडीने जेनेटिक आणि वंध्यत्व निवारण रुग्णालय सुरु करावे, याठिकाणी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु करावे, याच परिसरात आरटीओ कार्यालय बांधण्यात यावे आणि संपूर्ण परिसराला स्व. विमलताई मुंदडा यांचे नाव देण्यात यावे, महाबीजचे कार्यालय शहरात आणावे, महावितरण कार्यालयासमोरील उपोषणाच्या वेळी लिखित स्वरूप दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, केज तालुक्यातील पाथरा आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या दोन्ही ठिकाणी १३२ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात यावे तसेच सोमनाथ बोरगाव, डिघोळअंबा, उंदरी, वाघेबाभळगाव या ठिकाणी ३३ के.व्ही. उपकेंद्र सुरु करण्यात यावे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री आणि औषधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.