केजमध्ये भर उन्हात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:28 AM2019-05-21T00:28:54+5:302019-05-21T00:29:44+5:30
मांजरसुंबा ते अंबाजोगाई आणि केज ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी बारा वाजता भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केज : मांजरसुंबा ते अंबाजोगाई आणि केज ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी बारा वाजता भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अंबाजोगाई -मांजरसुंबा व केज - कळंब या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम दीड ते दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या रस्त्याचे काम नियोजनाच्या अभावामुळे संथ गतीने होत आहे. यातच कामाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात रस्ते खोदकाम करून ठेवल्याने जनतेला रस्त्यावरील खड्डे व धुळीने त्रस्त व्हावे लागत आहे. अवजड वाहने ओलांडून पुढे जाताना दुचाकी धारकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने खोदलेल्या रस्त्यावरुन वाहने गेल्या नंतर रस्त्यावर पाणी टाकले जात नसल्याने धुळीचे लोट उठत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना धुळीमुळे व रस्त्यावरील खड्ड्यामुळे मणक्याचे व श्वसनाचे आजार जडले आहेत.
त्यामुळे मांजरसुंबा ते अंबाजोगाई व केज ते कळंब रस्ता एकतर्फी वाहतूकीसाठी पुर्णता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी भर उन्हात दुपारी बारा वाजता तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता अशोक दास यांनी सदर रस्ता लवकरच वाहतूकीस पूर्णत: उपलब्ध करून देण्याच्या सुचना गुत्तेदारांना दिल्याचे सांगितले. तसेच धुळ उडू नये यासाठी खोदलेल्या रस्त्यावर पाणी मारण्याबाबतही सांगितल्याचे ते म्हणाले. मांजरसुंबा ते अंबाजोगाई व केज ते कळंब रस्त्यावरील पुलाच्या ठिकाणचे पॅचेस भरुन एकतर्फी रास्ता वाहतूकीस पूर्णत: खुला करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले
या आंदोलनात हनुमंत भोसले यांच्यासह महेश जाजू, नासेर मुंडे, एम डी घुले, रंगनाथ राऊत, भाई मोरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसेसह २०० पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, पो उपनिरीक्षक माळी, पो उपनिरीक्षक जाधव यांनी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.