गेवराईत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:31+5:302021-05-03T04:27:31+5:30
गेवराई : येथील नगर परिषद कार्यालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी व टोकन घेण्यासाठी शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून ...
गेवराई : येथील नगर परिषद कार्यालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी व टोकन घेण्यासाठी शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. यावेळी नगर परिषद कार्यालय तसेच बाहेर एवढी गर्दी झाली की, उपस्थित सर्वच जण सोशल डिस्टन्स व कोरोनाचे नियम विसरले होते. नागरिकांनी गोंधळ निर्माण केल्याने पोलीस बंदोबस्तात तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी फक्त महिलांसाठी लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गर्दी कमी झाली. तरी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, दत्ता दाभाडे, जयसिंग माने यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील नगर परिषद कार्यालयात सुरू केलेल्या कोरोना लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून यात शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून नगर परिषद कार्यालय व रस्त्यावर भली मोठी रांग लावून नागरिक उभे होते. लसीकरण सुरू होण्याआधीच नागरिकांनी गर्दी करून टोकन घेण्यासाठी गोंधळ निर्माण केला. त्यामुळे तहसीलदार सचिन खाडे व मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी पोलिसांना बोलावले. मात्र, तरीही गर्दी कमी होत नव्हती. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी फक्त महिलांसाठी लसीकरण होणार असल्याचे सांगितल्यानंतर तीन तासांनी गर्दी व गोंधळ कमी झाला.
लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या.
यात कोरोना नियमांचे तीनतेरा वाजले होते. हे लसीकरण केंद्र आहे की बाजार भरला असा प्रश्न अनेकांना पडला. नगर परिषद कार्यालयात व रस्त्यावर नागरिकांची तुफान गर्दी होती. शिवाय जिकडे तिकडे दुचाकी दिसत होत्या. तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलिसांचे नागरिकांनी तीन ते चार तास ऐकले नाही व गोंधळ निर्माण केला.
===Photopath===
020521\20210501_091855_14.jpg