धारूर तालुक्यात गारांसह तुफान पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:23+5:302021-02-19T04:23:23+5:30
बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी सायंकाळी आभाळ भरून आले होते. धारूर तालुक्यातील काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. यावेळी ...
बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी सायंकाळी आभाळ भरून आले होते. धारूर तालुक्यातील काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार सोसाट्याचा वारा होता. यात शेतात उभे असलेले पीक वाऱ्यामुळे आडवे झाले. आंब्याला आलेला मोहरही वाऱ्यामुळे उडून गेला. तसेच खाली पडला. याशिवाय देवठाणा, कांदेवाडी गावात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. देवठाणा शिवारात झालेल्या गारपिटीने टरबूज, खरबूज, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेलगाव येथे वीज कोसळण्याची घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय पातळीवर करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, गुरुवारी दिवसभर कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासनस्तरावर करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.
फोटो कॅप्शन : १) बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कांदेवाडी गावाच्या परिसरात गारांसह पडलेल्या पावसामुळे टरबुजाच्या पिकाचे नुकसान झाले. यात मोठी होत असलेली टरबुजे वेलीपासून वेगळी झाल्याचे दिसून येत आहे. (फोटो क्र.१८ बीईडीपी १०)
२) बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील देवठाणा गावाच्या परिसरात पडलेल्या गारांचे असे ढीग साचले होते.
(फोटो क्र.१८ बीईडीपी ११)