अजब ! प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी तहसील कार्यालयास बाहेरून लावले कुलूप; हतबल नागरिक बसले तिष्टत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 07:01 PM2021-05-04T19:01:09+5:302021-05-04T19:02:07+5:30
तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतःला अलिप्त केल्याने जनतेला अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : येथील तहसील कार्यालयात स्वतः तहसीलदार वैशाली पाटील या मुख्यद्वाराला बाहेरून कुलूप लावून आत बसत असल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन नोंदणीसाठी तिष्ठत बसले. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यां कार्यालयात प्लॅस्टिकच्या कॅबीनमधून काम करत आहेत. तसेच नगर परिषदेचे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये सतत रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना मुख्याधिकारी मात्र ठराविक ठिकाण सोडले तर रस्त्यावर उतरलेले दिसत नसल्याचे चित्र आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी देखील एकदाही रस्त्यावर दिसून आले नाहीत. अशा प्रकारे तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतःला अलिप्त केल्याने जनतेला अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
मागील दीड महिन्यांपूर्वी कोरोनाचा फैलाव वाढल्याने तो रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्यावर आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी, सर्व खात्यात समन्वय ठेऊन काम करणे, रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यावर मार्ग काढून नोंदणीप्रमाणे वाटप करणे अशी महत्वाची कामे तहसील प्रशासनाकडे आहेत. मात्र, तहसीलदार यांनी मंगळवारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतल्याचा प्रकार पुढे आला. शिपायास सांगून त्यांनी मुख्य प्रवेशद्वारास बाहेरून कुलूप लावून घेतले. यामुळे प्रवेश द्वाराबाहेर कोरोना रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन नोंदणीसाठी तिष्ठत बसले. तर इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांचाही खोळंबा झाला. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी देखील आपल्या कार्यालयात एक प्लास्टिकची कॅबीन तयार केली. या कॅबीनमध्ये बसून त्या काम करत आहेत. मात्र, त्यांनी देखील कधी ग्रामीण भागात रस्त्यावर उतरून काम केल्याचे दिसून आलेले नाही. नगर परिषदेच्या बाबतीत त्यांचे कर्मचारी आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पडण्यासाठी झटत असताना मुख्याधिकारी विशाल भोसले मात्र ठराविक ठिकाणे वगळता रस्त्यावर नाहीत. ते कुठे असतात यावर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील हे देखील रस्त्यावरून गायब आहेत. केवळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे हे आपल्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पेट्रोलिंग, वाहन तपासणी करून शहराला सुरक्षित ठेवण्याचा भार उचलत असल्याचे दिसून येत आहे.
काही नागरिक विनाकारण गर्दी करतात
काही नागरिक विनाकारण येऊन गर्दी करत आहेत. यामुळे आम्ही बाहेरून कुलूप लावले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था आम्ही केली आहे
- वैशाली पाटील, तहसीलदार.