'माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही': पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:48 PM2022-12-12T19:48:09+5:302022-12-12T19:50:12+5:30

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर राज्यभरातून चाहत्यांची गर्दी

'Strength to rise above any crisis'; Pankaja Munde's dialogue from Gopinath Gad | 'माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही': पंकजा मुंडे

'माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही': पंकजा मुंडे

Next

परळी ( बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची गोपीनाथ गडावर अनोख्या पद्धतीने  एकजूट दिसून आली.  गोपीनाथ गड आपापल्या गावी घेऊन जावा व राज्यातील अप्रिय घटनांबद्दल अर्ध्या तासाचे मौन  पाळावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते, त्याला राज्यात सर्वत्र  प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते व  नागरिकांनी आपापल्या गावी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत अर्ध्या तासाचे मौन पाळले.

सकाळी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे व त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, गौरव खाडे तसेच कुटूंबातील सदस्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल पंकजा मुंडे यांनी  उपस्थित  कार्यकर्त्यांसह अर्धा तास मौन पाळले, त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जेवढ्या वेदना देतात, तेवढीच प्रेरणाही देतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशात अनेक ठिकाणी त्यांची पूजा होते. त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. लोकसंग्रह एवढा आहे की त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, ही वाढ अशीच कायम रहावी असे कामं माझ्या हातून होईल असाच माझा नेहमी प्रयत्न आहे. खोटं बोलून राजकीय स्थान मिळवता येत नाही, कोणतंही संकट बाजूला सारून उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे, ते केवळ तुमच्यामुळेच असं त्या म्हणाल्या.

लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. मोनिका राजळे, आ. सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, आर टी देशमुख, अक्षय मुंदडा, देविदास राठोड, प्रवक्ते राम कुलकर्णी यांचेसह अनेक नेते उपस्थित.

महापुरुषांबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही
महापुरुषांना जातीवरून वाटू नका. जातीभेद नष्ट करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, म. फुले, राजर्षि शाहू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल चुकीच बोललं जाऊ नये. त्यांना जाती-जातीत विभागण्याचे काम आज होत आहे, हे अतिशय गंभीर व धोकादायक आहे. महापुरुषांची विभागणी जातीवरून करू नका हीच स्व. गोपीनाथ मुंडे यांची शिकवण आहे. जनतेसाठी जो कोणी चांगलं करेल त्याच्या हिताचं चिंतन आपण करतो. पुरोगामी महाराष्ट्राचे वेगळे चित्र उभे राहायला हवे आहे. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे इथलं राजकारण- समाजकारण गेलं पाहिजे. 

समाजकारण करेल तोच देशाचे भविष्य असेल 
सामान्य माणसाला आवाज असावा. कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये. सोशल मीडिया वापरून कोणी नेता बनू शकत नाही. त्यासाठी  लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करावे लागते. राजकारण करणारे अंसंख्य आहेत पण समाजकारण जो करेल तो या देशाचे भविष्य असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे याच मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर आहे. महाराष्ट्रात सुद्धा आता समाजाच्या विषयांना हात घालून समाजाचे विषय हाताळले जातील अशी अपेक्षा व  विश्वास मी गोपीनाथ गडावरून व्यक्त करते. विकास व उन्नतीचा भाग माझ्या मराठवाडा व विदर्भाच्या मागासलेल्या जनतेच्या पदरात पडो. या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय मिळो. त्यांच्यासाठी काम करणं हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.

चुकीचं सहन करणार नाही
माझ्या वाट्याला दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. जो चूक नसेल असा व्यक्ती माझ्यासमोर आला, त्याच्या धोतराला जोड असेल आणि त्याच्या जोड्याला दहा ठिकाणी शिवलं असेल ना तरी त्याच्या जोड्यावर डोकं ठेवेन. पण जर कुणी चुकीचा असेल तो माझ्या मनामध्ये कधीच  बरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे कधी राजकारण करत असताना चुकीची गोष्ट करायला लावू नका, मी ती करणारही नाही असे पंकजा मुंडे यांनी नि:क्षून सांगितले. आपोआप जे लोक जवळ आले आहेत तेच खरे आहेत आणि याच विचारांच्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. जेव्हा एखाद्याचं नाव होतं तर सेनापतीचे नाव लक्षात राहते. त्यामुळे तुम्हीच माझे शिल्पकार आहात. हीच ताकद व एकजूट कायम ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गझलमधून व्यक्त केल्या भावना 
इक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी। जाते जाते तुमने आवाज तो दी होगी, हर वक्त यही है गम.. उस वक्त कहाॅ थे हम..कहाॅ तुम चले गये । हर चीज पे अश्कों से, लिखा हे तुम्हारा नाम । ये रस्ते, घर, गलियाॅ तुम्हे कर ना सके सलाम..हाय दिल मे रह गयी बात..जल्दी से छुडाकर हाथ..कहाॅ तुम चले गये..या गझलमधून पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: 'Strength to rise above any crisis'; Pankaja Munde's dialogue from Gopinath Gad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.