निवासी डॉक्टरांवर कोविडसह शिक्षणाचाही ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:52+5:302021-03-29T04:19:52+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांवर कोरोनाच्या रुग्णसंख्येचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रुग्णसंख्या वाढत चालल्याने ...
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांवर कोरोनाच्या रुग्णसंख्येचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रुग्णसंख्या वाढत चालल्याने वैद्यकीय शिक्षकांचा बहुतांश वेळ कोरोना कक्षातच जात आहे. याचा विपरीत परिणाम वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर पडू लागला आहे. डॉक्टर्स मंडळी मोठ्या संख्येने कोरोना कक्षातच गुंतत चालल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एकलव्य होण्याची वेळ आली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातील रुग्णांचे आधार केंद्र म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जाते. रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच मराठवाड्यासह दूरदूरहून येणाऱ्या रुग्णांची संख्या इथे मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण रुग्णांना दर्जेदर सेवा देण्यासाठी हे रुग्णालय लौकिकास पात्र आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाची साथ सुरू झाली. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर रुग्ण निष्पन्न होण्यापूर्वीच स्वा. रा.ती. रुग्णालयात कोरोना कक्ष अद्यययावत करण्यात आला होता. आज एकावेळी ३०० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात तीन हजारांपेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. अंबाजोगाईच्या स्वा. रा.ती. रुग्णालयात अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, धारूर, वडवणी या तालुक्यांसह इतर ठिकाणचे रुग्णही उपचारासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. डॉक्टरांसोबतच निवासी डॉक्टरही मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा देत आहेत.
अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी दरवर्षी शंभर जागा भरल्या जातात, तर पदव्युत्तर शिक्षण घेणारे १२५ निवासी डॉक्टर रुग्णालयात आहेत.
निवासी डॉक्टरांना त्यांच्या विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा यासाठी डॉक्टरांची मार्ड ही संघटना वरिष्ठ पातळीवर बोलणी करीत आहे. जो मार्डचा निर्णय होईल, त्याप्रमाणे महाविद्यालय स्तरावर निर्णय घेतला जाईल.
- डॉ. सुमित साबळे, मार्ड सचिव, अंबाजोगाई.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा धसका घेऊन अनेक वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात न राहता घरी राहूनच अभ्यास करीत आहेत. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- एक विद्यार्थी
कोरोनामुळे आरोग्य विद्यापीठाच्या वतीने होणाऱ्या परीक्षांची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. तारीखच निश्चित नसल्याने परीक्षा कधी जाहीर होतील, अशी टांगती तलवार विद्यार्थ्यांसमोर आहे.
- एक विद्यार्थी.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश नोव्हेंबर महिन्यात संपले. फेब्रुवारी महिन्यापासून महाविद्यालय सुरू झाले. ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन तासिका तीन ते चारच होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- एक विद्यार्थिनी
कोरोनामुळे मोठे निर्बंध आले
गेल्या एक वर्षापासून अंबाजोगाईच्या रुग्णालयात अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वच तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवेत व्यस्त आहेत. अशाही स्थितीत रुग्णसेवा करत वैद्यकीय शिक्षक आपला मोठा वेळ देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. वर्षभरात तीन हजारांपेक्षा जास्त गंभीर कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. निवासी डॉक्टरांना रुग्णसेवेचा मोठा अनुभव या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.
विद्यार्थी- ४००
निवासी डॉक्टर- १२५
कोविड रुग्णालयात डॉक्टर १००