बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा मुख्याध्यापकांना ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:31 AM2021-05-01T04:31:47+5:302021-05-01T04:31:47+5:30
राज्यातील कोरोना स्थितीमुळे शिक्षण विभागाला वारंवार निर्णय बदलावे लागले. एप्रिल आणि मे महिन्यांत परीक्षेचे नियोजन केलेले असताना अचानक मार्चमध्ये ...
राज्यातील कोरोना स्थितीमुळे शिक्षण विभागाला वारंवार निर्णय बदलावे लागले. एप्रिल आणि मे महिन्यांत परीक्षेचे नियोजन केलेले असताना अचानक मार्चमध्ये कोरोनाची लाट आल्याने दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. या परीक्षांची तारीख जरी घोषित झाली होती, तरी परीक्षेसाठीचे साहित्य संबंधित केंद्रांवर कुठेही पोहोच झाले नव्हते किंवा त्याबाबत केंद्र पातळीवर बैठकाही झाल्या नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दहावीच्या उत्तरपत्रिका परीक्षेचे साहित्य मिळालेले नाही. परिणामी, संबंधित मुख्याध्यापकांचा भार हलका होणार असला तरी बारावीच्या परीक्षेचे साहित्य मात्र सांभाळावे लागणार आहे.
दहावीचे विद्यार्थी ४३९८५
बारावीचे विद्यार्थी ४१२००
हे साहित्य कस्टडीत
बीड जिल्ह्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बारावी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्ट, स्टिकर, सिटिंग प्लँट, एबी लिस्ट, विषयनिहाय व माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक पेपरचे साहित्य, ओएमआर, गुणपत्रिका आदी साहित्य कस्टडीत ठेवले आहे. एकूणच उत्तरपत्रिका तसेच वाटप करण्यात आलेले परीक्षा साहित्य सांभाळायचा मुख्याध्यापकांवर ताण वाढला आहे.
परीक्षेपर्यंत प्रतीक्षा
जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत हे साहित्य सांभाळावे लागणार आहे. बारावी परीक्षेसाठीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी फॉर्मेट व इतर साहित्य १३ एप्रिलदरम्यान पोहोचले आहे. होमसेंटरवर परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने पाणी, फर्निचर व इतर भौतिक सुविधांबाबत मंडळाकडून माहिती घेण्यात आली. उपलब्ध कर्मचारीसंख्या व इतर पूरक माहितीही घेण्यात आली. आता परीक्षेबाबत कोणताही निर्णय झाला, तरी तोपर्यंत कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा ताण मुख्याध्यापकांवर पडणार आहे.
-------------
परीक्षेवेळी सॅनिटायझेशन तसेच ऑक्सिमीटर व थर्मलगन लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी केली आहे. बारावी परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व फार्मसी शिक्षणासाठी तसेच विज्ञान, कला, वाणिज्य शाखांत प्रवेशासाठी बारावी परीक्षेत मिळणारे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे ही परीक्षा होईल, असे वाटते. - प्रदीप देशमुख, प्राचार्य, स्वा. सावरकर उच्च माध्यमिक विद्यालय, बीड
-------------
लसीचे निश्चितीकरण झाल्यानंतर डिसेंबरपासून वेळ होता. अठरा वर्षांच्या पुढील मुलांना लसीकरण आधी केले असते, तर परीक्षा घेता आल्या असत्या. तसेच पालक व समाजापर्यंत चांगला संदेश गेला असता. परीक्षेबाबत गुंतागुंत झाली नसती.
-
दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड
-----------------