कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक कारवाईची गरज - मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:26+5:302021-08-14T04:39:26+5:30
बीड : मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो, सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत ...
बीड : मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सक्षम कार्यवाही झाली व आपण कोरोनाला रोखू शकलो, सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क वापरत नसून निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्या कमी होत नाही. ग्रामीण व शहरी भागात कडक कारवाई होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना लसीकरण परिस्थिती तसेच कृषी, भूसंपादन, महावितरण आदी विषयी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. बैठकीसाठी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांसह विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका देशापुढे असून, जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण होऊनदेखील तिसरी लाट आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा यामध्ये जास्त रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासाठी पूर्वतयारी करताना केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या सूचना दिल्या असून, संसर्गाच्या लाटेदरम्यान केंद्राकडून ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार नाही. आपल्या बीड जिल्ह्यातदेखील यादृष्टीने सध्या असलेल्या क्षमता वाढविण्यासाठी प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्प तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
खासगी रुग्णालयाचे ऑडिट...
कोविड उपचारांसाठी ज्या खासगी रुग्णालयांना महात्मा फुले योजना लागू करण्यात आली होती, तेथे मोफत उपचार झाले नसल्यास प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल आणि केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. हे ऑडिट तातडीने पूर्ण करून रुग्णालयनिहाय लेखी स्वरूपात सादर करावेत, असेही पालकमंत्री मुंडेंनी स्पष्ट केले आहे.
पीककर्ज वितरण...
खरिपातील पीक कर्ज वितरणासाठी बँकांकडून दिरंगाई झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत येऊ शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी वाटप होताना दिसत असून, याबाबतचे कारण शोधण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीनंतर पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येता कामा नये. राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही ठराविक वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.