पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल
By सोमनाथ खताळ | Published: February 26, 2024 05:39 PM2024-02-26T17:39:39+5:302024-02-26T17:41:15+5:30
बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
बीड : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिल्ह्यात २२ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावर पोलिसांनी कडक कारवाई करत ४२५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मनोज जरांगे यांच्याविरोधात शिरूर आणि अंमळनेर या दोन पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. परंतु, कोठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. पोलिसांनी एकाही आंदोलनासाठी परवानगी दिलेली नव्हती. असे असतानाही २२ ठिकाणी रस्ता अडवून सामान्यांना वेठीस धरण्यात आले होते. वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सामान्यांना त्रास झाला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत २२ गुन्हे दाखल झाले असून जवळपास ४२५ पेक्षा जास्त आंदोलकांचा यात समावेश आहे. तसेच, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व शिरूर पोलिस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बीडची इंटरनेट, बससेवा केली बंद
अफवा पसरणार नाहीत, यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दुपारी १२ ते ५ अशी पाच तासांसाठी बंद करण्यात आली होती. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालनाकडे जाणाऱ्या बसही रविवारी मध्यरात्रीपासूनच थांबविण्यात आल्या होत्या. बीड व जालना जिल्ह्याची सीमाही सील केली होती. जिल्ह्यात २८ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला होता.