बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तलाठ्यासह पत्नीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:08 AM2019-12-31T00:08:06+5:302019-12-31T00:08:28+5:30
ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याप्रकरणी तलाठी मधुकर संभाजी वाघमारे यास ३ वर्षे सक्तमजुरी तसेच १ लाख रुपये दंड व त्याची पत्नी मंगल मधुकर वाघमारे हिस १ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजु शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.
बीड: ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याप्रकरणी तलाठी मधुकर संभाजी वाघमारे यास ३ वर्षे सक्तमजुरी तसेच १ लाख रुपये दंड व त्याची पत्नी मंगल मधुकर वाघमारे हिस १ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजु शेंडे यांच्या न्यायालयाने सुनावली.
तलाठी मधुकर संभाजी वाघमारे हा गेवराई तालुक्यात तलाठी पदावर असताना त्याने अवैधरित्या अमाप संपत्ती स्वत: व पत्नीच्या नावे जमा केल्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची उघड चौकशी केली.
तलाठी वाघमारे व त्याची पत्नी मंगल यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात २००५ मध्ये लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गौतम देशमुख यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर यांनी २००९ मध्ये तलाठी वाघमारे व त्याची पत्नी मंगल यांच्याविरुद्ध ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याप्रकरणी बीड येथील विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने १९ तर बचाव पक्षाने २ साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरुन व सरकार पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अंजू शेंडे यांनी तलाठी वाघमारे व त्याची पत्नी मंगल यांना उपरोक्त शिक्षा सुनावली. तसेच त्यांनी जमवलेली अवैध मालमत्ता अपील काळानंतर जप्त करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. त्यांना निवृत्त पोलीस बनसोडे, पोलीस शिपाई गरडे यांनी सहकार्य केले.