बीड पाेलिसांना कडक सॅल्यूट; गुन्हेगारांची कुंडली ठेवण्यात राज्यात अव्वल
By सोमनाथ खताळ | Published: September 9, 2023 07:45 PM2023-09-09T19:45:59+5:302023-09-09T19:46:09+5:30
पुण्यात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि सीसीटीएनएस विभागाच्या पथकाचा पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान
बीड : गुन्हेगारांची कुंडली ऑनलाईन करण्यात बीड पोलिस राज्यात अव्वल राहिले आहेत. पुण्यात पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि सीसीटीएनएस विभागाच्या पथकाचा पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते पदक देऊन शनिवारी सन्मान करण्यात आला. या कामगिरीमुळे बीड पोलिसांची मान उंचावली असून त्यांना सर्वस्तरातून कडक सॅल्यूट केला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून सर्वच विभागातील कारभार ऑनलाईन झाला आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारांची माहिती अपडेट ठेवली जाते. तसेच सर्व एफआयआर व इतर घडामोडींची एका क्लिकवर माहिती मिळत आहे. यासाठी स्वतंत्र सीसीटीएनएस विभाग आहे. या विभागाने मागील सहा महिन्यात सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. केवळ एकवेळा दुसऱ्या स्थानी बीड पोलिस आले होते. बीड पोलिसांपाठोपाठ दुसऱ्या स्थानी नांदेड तर तिसऱ्या क्रमांकावर रायगड पोलिस आहेत. शनिवारी सायंकाळी पुण्यातील एसआरपीएफच्या मैदानावर बीड पोलिसांना पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सीसीटीएनएस विभागाचे निलेश ठाकूर, मच्छिंद्र बीडकर, चंद्रसेन राऊत या टीमचा पोलिस महासंचाल रजनीश शेठ, सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक बोरडे यांच्या हस्ते सन्मान झाला. यामुळे बीड पोलिसांची मान उंचावली आहे.