"संघर्ष पाचवीलाच पूजलेला"; पंकजा मुंडेंची मोठी घोषणा,"लवकरच मी तुमच्यापर्यंत येणार..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:37 PM2024-06-06T18:37:23+5:302024-06-06T18:38:44+5:30
पंकजा मुंडे दिल्लीकडे रवाना, परत येताच काढणार आभार दौरा
परळी (बीड) : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार पंकजा मुंडे यांची आज सकाळी परळी येथे अनेक कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी कार्यकर्ते भाऊक झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी, लोकसभा निवडणुकीत ज्यांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले त्यासर्वांचे आभार मानले. दरम्यान, पंकजा मुंडे आज परळीहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तेथून थेट नवी दिल्लीत जात भाजपाच्या बैठकीत त्या सामील होणार आहेत.
संपूर्ण राज्यात बीड लोकसभेचा निकाल धक्कादायक लागला. सर्वात चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या ( शरद पवार) बजरंग सोनवणे यांनी अत्यंत कमी मतांनी पराभव केला. निकालानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी मतदार आणि समर्थकांसाठी आज भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात सोशल मिडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत मदत करणाऱ्या सर्वांचे आणि मतदारांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ''माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वांचे आभार. त्या ६ लाख ७७ हजार मतदारांचेही मनापासून आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला मतदान केलं. अत्यंत टफ फाईट अत्यंत विपरित परिस्थितीत मी देऊ शकले ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर''
पुढच्या आठवड्यात काढणार आभार दौरा
पंकजा मुंडे आज मुंबईकडे आणि त्यानंतर पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यानंतर १२ किंवा १५ तारखेपासून आभार दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. ''तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी! संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो.'' असंही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.