गरिबांच्या मदतीला धावणारी संघर्ष धान्य बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:57+5:302021-08-29T04:31:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : आपण पैसे ठेवणाऱ्या, काढणाऱ्या, सोने तारण ठेवणाऱ्या बँका पाहतो; पण गरजू, गरिबांना, अनाथालयांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : आपण पैसे ठेवणाऱ्या, काढणाऱ्या, सोने तारण ठेवणाऱ्या बँका पाहतो; पण गरजू, गरिबांना, अनाथालयांना धान्य पुरविणारी गेवराई तालुक्यातील संषर्घ धान्य बँक जिल्ह्यातील एकमेव आहे. ही बँक गेवराई तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. या धान्य बँकेच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास ७ अनाथालयाला, ३०० गरजू व गरजवंतांना या बँकेमार्फत धान्य वाटप केले आहे. या धान्य बँकेच्या तालुक्यात ५ शाखा आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या बँकेचे अखंड सामाजिक कार्य चालू आहे. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो, या सामाजिक बांधीलकीच्या उद्देशाने शिक्षक शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, सुरेश भोपळे, धर्मराज करपे, सुभाष काळे, बाळासाहेब गावडे, सुरेश नवले या सात जणांनी एकत्र येत तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये एका संघर्ष धान्य बँकेची स्थापना केली. समाजातील ज्या व्यक्तीला काही तरी दान द्यायचे आहे किंवा घरातील व्यक्तींचा वाढदिवस असेल, कोणाची पुण्यतिथी असेल अशा वेळी समोरील व्यक्ती मदत करते. ती मदत धान्याच्या स्वरूपात देतो. ते सर्व धान्य बँकेचे सदस्य एकत्र जमा करतात. महिन्याकाठी जेवढे धान्य जमा होईल तेवढे धान्य बीड जिल्ह्यात असलेल्या अनाथालयात मागणी होईल तेथे नेवून देण्याचे कार्य करतात. हे काम संघर्ष धान्य बँकेचे सर्व सदस्य करतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे धान्य बँकेचे कार्य खूप वाढले.
....
गरजुंना दोन लाखांचा किराणाही वाटला
संघर्ष धान्य बँकेच्या गेवराईनंतर मादळमोही, उमापूर, धोंडराई, बंगालीपिंपळा येथे शाखा आहेत. यातून तीन वर्षात जिल्ह्यातील सेवातीर्थ, आदिवासी, स्नेह सावली, इन्फट इंडिया, आपला परिवार, आजोळ प्रकल्प अशा विविध ठिकाणी अनाथालयात धान्य दिले जात आहे. आजपर्यंत ३०० च्या जवळपास गरजू व गरजवंताना २ लाख रुपयांचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे. याशिवाय बँकमार्फत वृक्षारोपण, समाजसेवकांना संत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार देण्यात येतो. यासाठी मदतीचा ओघही वाढत आहे. दर महिन्याला समाजातील दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत, असे बँकेचे प्रमुख शिवाजी झेंडेकर, धर्मराज करपे यांनी सांगितले.
280821\sakharam shinde_img-20210827-wa0019_14.jpg~280821\sakharam shinde_img-20210827-wa0018_14.jpg
गरिबांच्या मदतीला धावणारी संघर्ष धान्य बँक